नगर- झोपेत असताना वृद्धाच्या डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. चिंचेवाडी (ता. संगमनेर) येथे डोंगरात लपून बसलेले असताना पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
नामदेव रंगनाथ सोन्नर (वय २५, रा. चिंचेवाडी, साकूर, ता. संगमनेर), सुरेश बाबुराव कोकरे (वय २५, रा. कोकरेवस्ती, चिंचेवाडी, साकूर, ता. संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत. संगमनेर तालुक्यातील चिंचेवाडी येथील महिबाबा मंदिर परिसरात देवराख खेमनर झोपलेले असताना डोक्यात दगड घालून त्यांचा खून करण्यात आला होता.
मृत यांचा मुलगा बाळू देवराम खेमनर यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. खुनातील आरोपींना पकडण्यासाठी एलसीबीचे पथक रवाना करण्यात आले होते. दरम्यान, तपास करीत असताना नामदेव सोन्नर व सुरेश कोकरे या दोघांनी खून केला असल्याची माहिती मिळाली, तसेच दोघेही चिंचेवाडी डोंगरामध्ये लपून बसले असल्याचे खबऱ्याकडून पोलिसांना समजले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी कबुली दिली, तसेच दारू पिण्यासाठी मृत खेमनर यांच्या खिशातील पैसे काढून, त्यांच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याचे आरोपींनी सांगितले.