Advertisement

आचारसंहितेत उपकेंद्र उद्घाटनाचा डाव फसला;आ.प्रकाश सोळंके तोंडघशी

प्रजापत्र | Tuesday, 29/12/2020
बातमी शेअर करा

बीड : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीची आचारसंहिता सुरु असतानाही कोठरबन ता.वडवणी येथील आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन उरकून घेण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव ग्रामपंचायत सदस्यांच्या सतर्कतेने आणि प्रशासनाच्या कठोर भूमिकेमुळे फसला आहे. या प्रकरणात माजलगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळंके चांगलेच तोंडघशी पडले.
माजलगाव विधानसभा मतदार संघात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता सुरु असतानाही कोठरबन ता.वडवणी येथील आरोग्य उपकेंद्राच्या उद्घाटनाचे नियोजन मंगळवार दि.29 रोजी करण्यात आले होते. आ.प्रकाश सोळंके यांच्या हस्ते हे उद्घाटन उरकण्यात येणार होते. सुधाकर मुंडे या इसमाने आपण सरपंच आहोत असे सांगून हे उद्घाटन उरकण्याचा घाट घातला होता. मात्र या कार्यक्रमाला कोठरबनचे उपसरपंच बाळासाहेब मुंडे व ग्रामपंचायत सदस्य सुमित्रा डोंगरे, सोनाली मुंडे यांनी आक्षेप घेत प्रशासनाकडे धाव घेतली होती. यात उपकेंद्राचे काम अजून पूर्ण झालेले नाही असा दावाही आक्षेपकर्त्यांनी घेतला होता. या प्रकरणात आचारसंहिता प्रमुख तथा वडवणीच्या गटविकास अधिकार्‍यांनी उद्घाटनाचा असा कोणताही कार्यक्रम घेऊ नये, असा कार्यक्रम घेतल्यास गुन्हे दाखल करु असा इशारास संबंधितांना दिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आचारसंहितेत उपकेंद्र उद्घाटनाचा डाव फसला असून आ.प्रकाश सोळंके चांगलेच तोंडघशी पडले आहेत. 

 

Advertisement

Advertisement