समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबांना २५ लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली. वडेट्टीवार यांनी आज पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे समृद्धी महामार्गावर होत असलेल्या अपघातांच्या अनुषंगाने विषय उपस्थित केले.
सभागृहात बोलताना वडेट्टीवार म्हणाले, १ जुलै २०२३ रोजी समृद्धी महामार्गावर भयावह अपघात झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकी २५ लाख रुपये देण्याची घोषणा केली होती.
मात्र प्रत्यक्षात मृतांच्या कुटुंबियांना केंद्राकडील २ लाख रुपये आणि राज्य सरकारचे ५ लाख रुपये असे केवळ ७ लाख रुपयेच देण्यात आले. मृतांच्या कुटुंबियांनी भेट घेतल्यानंतर त्यांच्या वेदना समजून घेतल्या डोळ्यात पाणी आलं, अशी खंतही वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.