परभणी- पंकजा मुंडे जर गंगाखेड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असतील तर मी गंगाखेड विधानसभा मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडण्यास तयार आहे. असे जाहीर वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी केले आहे.
गंगाखेड तालुक्यातील माखणी येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. आमदार रत्नाकर गुट्टे म्हणाले, की भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे सांगत आहेत की पंकजा मुंडे यांना मी निवडणुकीत पाडेन. अशा पद्धतीचा अपप्रचार भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून माझ्याविषयी चालू आहे. पण मी पंकजा मुंडे यांचा आदर करत आहे. त्यांनी जर गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा जाहीर केली तर मी गंगाखेड विधानसभा मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडेन.