उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द झाला आहे. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीये. अजित पवार आज छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार होते. मात्र दौरा रद्द झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यातच असणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन राजकीय नेत्यांना विविध ठिकाणी विरोध केला जातोय. अजित पवारांच्या आजच्या दौऱ्याला देखील काही मराठा आंदोलकांनी विरोध केला. विरोध करत असलेल्या गंगापूर तालुक्यातील दोन आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे. याचे उद्घाटन आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार होते. मात्र या संमेलनाला अजित पवारांनी येऊ नये म्हणून सकल मराठा समाजाने आवाहन केलं होतं.एकंदर परिस्थितीमुळे गावात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोंधळ होण्याची चिन्हे होती. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यत घेतलं. मात्र, नंतर अजित पवारांचा दौरा हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रद्द झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.