एक्झिट पोल आणि एक्झॅक्ट पोल यामध्ये फरक आहे, हे मान्य केले तरी आतापर्यंतच्या इतिहासात काही अपवाद वगळता एक्झिट पोलचे अंदाज बऱ्यापैकी वास्तवात उतरले आहेत. त्यामुळे लोकसभेची रंगित तालीम मानल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालाच्या संदर्भाने जर एक्झिट पोल म्हणतात तसे झाले तर ती कॉंग्रेससाठी मोठी संजिवनी ठरणार आहे. त्यासोबतच भाजप आता राजकारणाची कोणती पातळी गाठणार हे देखील पहावे लागणार आहे.
लोकसभा निवडणुकांची रंगित तालीम मानल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे मतदान संपले आहे. तेलंगणामधील मतदान संपल्याबरोबर वेगवेगळ्या माध्यमांचे एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. एक्झिट पोल ही सारी प्रक्रिया एका विशिष्ट प्रणालीवर अवलंबून असते आणि काही टक्के मतदारांनी व्यक्त केलेल्या अंदाजांचे विश्लेषण असते हे सुरुवातीलाच आम्ही देखील स्पष्ट करतो. त्यामुळे एक्झिट पोलमध्ये आहे तेच रविवारी एक्झॅक्ट पोलमध्ये दिसेलच असा आमचा दावा नाही. पण मागच्या काही काळात काही अपवाद वगळता एक्झिट पोलचे अंदाज बऱ्यापैकी वास्तवात उतरलेले आहेत. त्यामुळे आता जे अंदाज समोर आले आहेत, त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
मुळात मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ या तिन्ही राज्यांमध्ये कॉंग्रेससाठी सकारात्मक चित्र असल्याचे एक्झिट पोल सांगत आहेत. अर्थात निवडणूक काळातले एकंदर वातावरण आणि हतबल झालेली भाजपा ज्यांनी पाहिली आहे, त्यांना याचे काहिच आश्चर्य वाटणार नाही. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने नेहमीप्रमाणे मोदींचाच चेहरा वापरला. स्थानिक कोणत्याही नेत्याला भाजपने प्रोजेक्ट केले नव्हते. अगदी मध्यप्रदेश सारख्या राज्यात मुख्यमंत्री असलेल्या शिवराजसिंह यांचे तिकीट सुध्दा फार उशीरा जाहिर करण्यात आले होते. राजस्थानात माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांची नाराजी भाजपला दुर करता आली नाही, आणि ती नाराजी वारंवार अनेकांनी अनुभवली. यावेळी कॉंग्रेसमध्ये मात्र एकदम उलटे वातावरण होते. कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची सुत्रे घेतल्यापासून मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षात जी भूमिका घेतली आहे, त्यातून त्यांनी गटबाजी चालणार नाही हा स्पष्ट संदेश दिला आहे. कर्नाटकात दिलजमाई करुन आपण जिंकू शकतो हा विश्वास दिल्यानंतर त्यांनी राजस्थानात गेहलोत-पायलट आणि मध्यप्रदेशात कमलनाथ- दिग्विजयसिंह यांच्यात जे मनोमिलन घडविले, त्याचा परिणाम प्रचारातही दिसून आलाच. बाकी स्थानिक नेतृत्वाला पुढे करण्याचे जे काही फायदे असतात, ते कॉंग्रेसला होतील असे अपेक्षित आहे. तेलंगणात बीआरएस ही भाजपची बी टीम असल्याची जी भूमिका कॉंग्रेसने घेतली आणि तेथे बीआरएसला जो थेट विरोध केला, त्याचा फायदा कदाचित कॉंग्रेसला होणार आहे.
आज जे एक्झिट पोलमध्ये आले आहे, ते जर वास्तवात उतरले तर ते कॉंग्रेससाठी मोठे बुस्टर ठरेल. पराभूत मानसिकतेतून एखाद्या पक्षाला बाहेर काढण्यासाठी असे विजय महत्वाचे असतात आणि त्याचा फायदा निश्चितच कॉंग्रेसला लोकसभेसाठी घेता येईल. पाच पैकी तीन राज्यांमध्ये जरी कॉंग्रेसने सत्ता मिळविली तरी इंडीया आघाडीत कॉंग्रेसचे वजन वाढणार आहे. त्यासोबतच केवळ धृविकरण करुन नेहमीच यश येत नाही, हे लक्षात घेत भाजपची राजकारणाची दिशा काय राहणार ही भीती आहेच. कारण पुलवामासारख्या घटनांनी निर्माण केलेले वातावरण अजूनही लोक विसरलेले नाहीत.