Advertisement

वसतिगृहात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याची आत्महत्या

प्रजापत्र | Thursday, 09/11/2023
बातमी शेअर करा

अंबाजोगाई - स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृह विभागातील तृतीय श्रेणी कर्मचारी वैजनाथ अनंत काळे याने महाविद्यालयाच्या पीजी बॉईज वसतिगृहातील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली.

अधिक माहिती अशी की, वैजनाथ अनंत काळे हे गेली २० ते २५ वर्षांपासून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय श्रेणी कर्मचारी या पदावर कार्यरत आहेत. सध्या त्यांची ड्युटी पी.जी. वसतिगृह विभागात होती. वैजनाथ काळे हे आज सकाळी नेहमीप्रमाणे ड्युटी साठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात आले. आपल्या सहकाऱ्यांशी गप्पा मारुन ते वसतिगृहाकडे गेले. वसतिगृहात कार्यरत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांशी त्याने गप्पा मारल्या आणि फ्रेश होण्यासाठी ते वसतिगृहाच्या रूममध्ये गेले. बराच वेळ झाला तरी ते आले नाही हे पाहून इतर कर्मचाऱ्यांनी त्या रुमचा दरवाजा उघडला असता त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

सदरील घटनेची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांनी तातडीने वरीष्ठ अधिकारी व सुरक्षा विभागाला दिली. या प्रकरणी पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मात्र मयत बैजनाथ काळे यांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली हे अजून स्पष्ट झाले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Advertisement

Advertisement