Advertisement

चिंताजनक ! जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये फक्त 10 टक्केच पाणीसाठा

प्रजापत्र | Thursday, 14/09/2023
बातमी शेअर करा

बीड- यावर्षी बीड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे गडद संकट उभे ठाकले आहे. परतीच्या पावसावर आता सर्व अवलंबून असून राहिलेल्या 20 ते 25 दिवसात समाधानकारक पाऊस पडला तर ठिक नाही तर परत जिल्ह्याला कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत फक्त 10.70 टक्के पाणीसाठा शिल्लक असून 143 प्रकल्पापैकी 71 प्रकल्प जोत्याखाली आले असून 21 प्रकल्प कोरडे पडले आहेत तर 25 टक्क्याखाली 35 प्रकल्प 25 ते 50 टक्क्यामध्ये 13 प्रकल्प, 75 टक्क्यापेक्षा वर असणार्‍या प्रकल्पात फक्त 1 प्रकल्प, शंभर टक्क्यामध्ये 2 प्रकल्प आहेत. जिल्ह्यामध्ये फक्त दहा टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्यामुळे जिल्हा प्रशासनाने या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. बीड जिल्ह्यात तीन-चार वर्षाआड दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होतेच, याहीवर्षी जिल्ह्यात दुष्काळाचे संकट गडद असल्याचे चित्र निर्माण झाले असून राहिलेल्या दिवसात पाऊस आला तर ठिक नसता परत बीडकरांना दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. पावसाचे तीन महिने संपले तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे  शेतकर्‍यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. थोड्याफार पडलेल्या पावसावर पिके काही गेली तर काही आली तर काही पिकांची  वाढ खुंटली असल्यामुळे यंदा शेतकर्‍यांच्या पदरात अल्प प्रमाणातच उत्पन्न पडेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. यासह दुष्काळ  पडलाच तर पाण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना वणवण भटकंती करावी लागणार आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने आतापासूनच पाऊस न पडल्यास आहे त्या पाण्याचे नियोजन करून आलेल्या संकटातून जिल्हाकरांना बाहेर कसे पडावे याचे नियोजन करण्याची गरज आहे

Advertisement

Advertisement