भारताच्या चांद्रयान ३ च्या यशस्वी मोहिमेनंतर आता ऑस्ट्रेलियाही आपलं यान चंद्रावर पाठवण्याच्या तयारी आहे. नासाच्या आर्टेमिस चांद्र मोहिमेसोबत ऑस्ट्रेलिया आपलं रोवर चंद्रावर पाठवणार आहे. ही मोहीम २०२६ पर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज आहे. हा एक रोबोटिक रोवर असेल. या रोवरच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागावरच्या मातीचा अभ्यास केला जाईल. ऑस्ट्रेलियन अंतराळ संशोधन संस्थेने ही घोषणा केली आहे.
ऑस्ट्रेलियन अंतराळ संशोधन संस्था अर्थात ASA ने नासासोबत भागीदारी करत ही मोहीम पूर्ण कऱण्याचं नियोजन केलं आहे. ऑस्ट्रेलिया आपल्या रोवरचं डिझाईन स्वतः करेल, निर्मितीही स्वतः करेल. ऑस्ट्रेलिया संपूर्ण जगामध्ये आपल्या रिमोट कम्युनिकेशन सिस्टीमसाठी ओळखला जातो. त्यामुळे ते रोवरपासून थेट संपर्क करण्याचाही प्रयत्न करेल.
या रोवरला इलॉन मस्कची कंपनी स्पेस एक्सच्या स्टारशीपच्या मदतीने किंवा फॉल्कन हेवी रॉकेटच्या साहाय्याने चंद्रावर पाठवलं जाईल. मातीचं सॅम्पल घेतल्यानंतर नासा याच्यापासून ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न करेल. जेणेकरून भविष्यात चंद्रावर जेव्हा माणूस जाईल तेव्हा तो मातीपासून ऑक्सिजन मिळवू शकेल.
ऑस्ट्रेलियाने अजून आपल्या रोवरचं नाव ठेवलेलं नाही. पण त्यांनी लोकांना या रोवरचं नाव ठेवण्यास सांगितलं आहे. त्यांनी ट्विट करून नावं मागवली आहेत. फक्त अट इतकीच की तुम्ही ऑस्ट्रेलियाचे नागरीक असावं. यासाठीची स्पर्धाही सुरू झाली आहे. नाव सुचवण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०२३ ही असून ६ डिसेंबर २०२३ रोजी निवडलेल्या नावाची घोषणा केली जाईल.