Advertisement

अंबाजोगाईत जिल्हा निर्मितीसाठी रास्तारोको

प्रजापत्र | Wednesday, 09/08/2023
बातमी शेअर करा

अंबाजोगाई - बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई स्वतंत्र जिल्हा निर्माण करावा. या मागणीसाठी (दि.९) रोजी येथील यशवंतराव चव्हाण चौकात आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

अंबाजोगाई जिल्हा निर्मिती कृती समितीच्यावतीने क्रांतीदिनी जिल्ह्याच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलनाची हाक देण्यात आली होती. यानुसार सर्व पक्ष, संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत रास्तारोको आंदोलन केले. बीड जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र अंबाजोगाई जिल्हा करावा, अशी मागणी अंबाजोगाईकर गेल्या ३० वर्षांपासून करीत आहेत. 

या मागणीकडे प्रशासनाचे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत जिल्हा निर्मिती होत नाही तोपर्यंत विविध माध्यमातून आंदोलन सुरूच राहणार. १७ सप्टेंबर पर्यंत जिल्हा घोषित करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी कृती समितच्या वतीने देण्यात आला.आंदोलनात माजी आमदार संजय दौंड, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, भाजपाचे नेते अक्षय मुंदडा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, माजी उपनगराध्यक्ष बबन लोमटे, सामाजिक कार्यकर्ते अनिकेत लोहिया, शिवसेनेचे गजानन मुडेगावकर, मनसेचे सुनील जगताप, रिपाई, काँग्रेस, पक्ष, रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई यांच्यासह सर्वपक्ष, सामाजिक संघटना व कृती समितीचे कार्यकर्ते सहभागी होते.

Advertisement

Advertisement