बीड दि.६ (प्रतिनिधी)-राज्यात घडलेल्या घडामोडीनंतर शरद पवारांनी राष्ट्रवादीची मोट पुन्हा बांधण्यासाठी कंबर कसली आहे.येवल्यानंतर आता बीडमध्ये १७ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांची सभा होणार आहे.आ.संदीप क्षीरसागर यांनी सभेच्या पूर्वतयारीसाठी बैठकीचे आयोजन केले असून ७ ऑगस्ट रोजी मांजरसुंबा येथील हॉटेल कन्हैयामध्ये सकाळी १० वाजता पाच पंचायत समितीच्या गणांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या बैठकीसाठी बोलविले आहे.दरम्यान आ.क्षीरसागरांनी चालू केलेल्या या बैठकींच्या सत्रामुळे शरद पवारांच्या सभेला बीड जिल्हावासियांचा तुफान प्रतिसाद मिळणार असल्याचे संकेत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांनी बंड केल्यानंतर आता या पक्षात फूट पडली आहे.बीड जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते अजित पवारांच्या गटात गेले असून आ.संदीप क्षीरसागर यांनी मात्र आपली निष्ठा शरद पवारांच्या सोबत दाखविली आहे.त्यामुळे आता येवल्यानंतर प्रकृतीच्या कारणामुळे रखडलेल्या सभा पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातून शरद पवार सुरु करणार आहेत.ही सभा ऐतिहासिक व्हावी यासाठी आ.संदीप क्षीरसागर कामाला लागले असून उद्या (दि.७) मांजरसुंबा येथील हॉटेल कन्हैयामध्ये येळंबघाट,नेकनूर,मांजरसुंबा,लिंबागणेश,चौसाळा,बोरखेड,पाली पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या बैठकीसाठी उपस्थिती राहण्याचे आवाहन राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आले आहे.