बीडः शहरामध्ये मागील काही दिवसांपासून रस्त्यावरून चालणार्या नागरिकांचे मोबाईल लंपास करण्यात आल्याच्या घटना सातत्याने समोर येत होत्या. 14 मे 2022 रोजी रात्री 9.30 च्या सुमारास धर्मराज बाबूराव प्रभाळे (वय 38 रा.पोस्टमन कॉलनी) यांचा मोबाईल नारायणा इंग्लिश स्कुल येथुन दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी लंपास केला होता. या प्रकरणात शिवाजी नगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान बीड शहरात त्यानंतरही मोबाईल चोरीच्या घटना घडत असल्यामुळे याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. त्यानंतर पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्या पथकाने दोन अट्टल मोबाईल चोरट्यांना आयोद्धा नगर भागातून गजाआड केले आहे.
सागर उर्फ बाळू बबन भांडवलकर (वय 22), अभिषेक बंडू घोलप (वय 22) रा.दोघे एमआयडीसी आयोद्धा नगर यांना स्थानिक गुन्हा शाखेने पकडले आहे. सागर आणि अभिषेक बीड शहरात दुचाकीवरून नागरिकांचे मोबाईल लंपास करत होते. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी या दोन्ही आरोपींना अटक केली. यावेळी सागरकडून एक मोबाईलही हस्तगत करण्यात आला असून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सदरची कामगिरी पोलिस निरीक्षक संतोष साबळे, पोलिस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, मनोज वाघ, प्रसाद कदम, सोमनाथ गायकवाड, विकास वाघमारे, सचिन आंधळे, विकी सुरवसे, अशोक कदम यांच्या वतीने करण्यात आली.