मागील काही दिवसांपासून वन विभागाच्या परीक्षेत गैरप्रकार होत असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात याचे मोठं रॅकेट असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. औरंगाबाद शहर पोलीस दलाच्या एमआयडीसी सिडको पोलिसांनी वन विभागाच्या परीक्षेतील घोटाळा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. वन विभागाच्या परीक्षेत पास करुन देण्यासाठी पाच ते दहा लाख रुपये घेणाऱ्या या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. तर, या प्रकरणी एकूण चार लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल धनराज निचड (वय 30 वर्ष, व्यवसाय - शिक्षण, रा.मु.पो. खंदाळा, ता. आकोट जि. अकोला), आण्णाजी धनाजी काकडे (वय-29 वर्ष व्यवसाय-संत बाळुमामा ऍकडमी संचालक, रा.मुक्काम पिंपळवाडी, पोस्ट वडुज, ता. खटाव, जि.सातारा), अनिल भरत कांबळे (रा. जिल्हा सातारा), संदिप भुतेकर (रा. औरंगाबाद) असे या आरोपींचे नावं आहेत.
वन विभागाच्या परीक्षेत उमेदवारांना पास करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले जात असल्याची माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे, पोलिसांनी या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार छापेमारी करुन चौकशी केली असता हे रॅकेट समोर आले आहे. यातील चारही आरोपींनी संगनमत करुन परीक्षार्थींना वनरक्षक पदाची शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्यांचेकडून प्रत्येकी 10 लाख रुपयांची मागणी केली. यासाठी विद्यार्थ्यांकडून मूळ कागदपत्रे ताब्यात घेऊन, त्यांच्याकडून चेक सुद्धा घेतल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे. त्यामुळे, पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत आरोपी संदीप भुतेकर याच्या नावाने पाच लाखाचा चेक, अमोल धनराज निचड याच्या नावाने पाच लाख रुपयांचा दोन चेक मिळून आले आहेत. तर विद्यार्थ्यांचे दहावी सनद, मार्कशिट, डोमिसाईल, नॅशनॅलिटी प्रमाणपत्र व कास्ट प्रमाणपत्र सापडले आहे. या सर्व आरोपींकडून मुलांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. तसेच यासाठी मोठी रक्कम देखील घेतली जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे.
चार दिवसांतील चौथी कारवाई...
वन विभागाच्या परीक्षेतील गैरप्रकाराच्या घटना सतत औरंगाबाद शहरात घडताना पाहायला मिळत आहे. कारण मागील चार दिवसांत ही मोठी घटना समोर आली आहे. कारण, यापूर्वी औरंगाबादमध्ये वनरक्षक भरती परीक्षेत हायटेक कॉपीचे तीन प्रकार समोर आले आहेत. सुराणानगर आणि चिकलठाणा एमआयडीसी आणि वाळूज येथील परीक्षा केंद्रावर तीन परीक्षार्थींना ब्ल्यू टूथ, मोबाईल, मख्खी हेडफोन, मास्टर कार्ड रिडरसहीत ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणी सचिन अंबादास राठोड, नितीन संजय बहुरे (19, रा. बेंबळ्याची वाडी, घोडेगाव, जि. औरंगाबाद) आणि सतीश मदनसिंग जारवाल (28, रा. टाकळेवाडी, ता. गंगापूर, औरंगाबाद) अशी परीक्षार्थींची आणि बाहेरून मदत करणारा करण चतरसिंग गुसिंगे यांचा आरोपींमध्ये समावेश होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आला आहे.