पाकिस्तानचे माजी पंतप्रधान तथा पाकिस्तान तहरिक ए इन्साफ ( पीटीआय ) पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत. पाकिस्तानमधील जिल्हा सत्र न्यायालयाने इम्रान खान यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तोशखाना प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
शिक्षा सुनावल्यानंतर लाहोर येथील जमान पार्क निवासस्थानातून इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने इम्रान खान यांना १ लाख रुपयांचा दंड ठोठावला असून ५ वर्ष निवडणूक लढण्यास बंदी घालण्यात आली आहे.
पाकिस्तामधील मुस्लीम लीग-नवाझ ( पीएमएल-एन ) पक्षाच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारने ऑगस्ट २०२२ मध्ये इम्रान खान यांच्यावर तोशखाना प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. तेव्हा तोशखाना प्रकरण चर्चेत आले होते. पंतप्रधान असताना इम्रान खान यांनी त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती तोशखाना विभागाकडे उघड केली नाही. तसेच, या भेटवस्तू बेकायदेशीरपणे विकल्याचा आरोप इम्रान खान यांच्यावर करण्यात आला होता.
४ भेटवस्तू विकल्याचं केलं कबूल
पाकिस्तानमध्ये तोशखाना विभागाची १९७४ साली स्थापना झालेली आहे. लोकप्रतिनिधींना मिळालेल्या भेटवस्तू नियमाप्रमाणे या विभागात जमा करत माहिती देणं बंधनकारक असते. पण, २०१८ साली सत्तेवर आल्यानंतर इम्रान खान यांनी मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती तोशखाना विभागाला देण्यास नकार दिला. माहिती दिल्यास अन्य देशांशी असलेल्या संबंधावर परिणाम पडेल, असा दावा इम्रान खान यांनी केला होता. त्यानंतर इम्रान खान यांनी पाकिस्तान निवडणूक आयोगाला पत्र लिहून मिळालेल्या भेटवस्तूंपैकी साधारण ४ भेटवस्तूंची विक्री केल्याचे कबूल केलं होतं. विक्री केलेल्या भेटवस्तूंची तोशखाना विभागाला उचित किंमत दिल्याचाही दावा इम्रान खान यांनी केला होता.