अमरावती - माजी मंत्री, काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ट्विटरवरून ही धमकी देण्यात आली आहे. असंच बोलत असाल तर दाभोळकर करू, असा इशारा धमकी देणाऱ्या व्यक्तीने यशोमती ठाकूर यांना दिला आहे. या धमकी प्रकरणावर यशोमती ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. या वक्तव्याला काँग्रेसकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. आमदार यशोमती ठाकूर या देखील आक्रमकपणे या मुद्द्यावर बोलताना दिसल्या. त्यांनी अमरावतीत रस्त्यावर उतरत आंदोलनही केलं. त्याच पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया
तुम्हाला काय करायचंय ते करा. मला मारायचं असेल तर मारा पण संभाजी भिडे यांच्या वक्तव्याला मी विरोध करत राहणार. पण माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर त्याला गृहखातं जबाबदार असेल, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत.