बीड – मागच्या कांही दिवसांमध्ये बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशके यांची विक्री व प्रमाणित बियाणांची, खते व कीटकनाशकांची जादा दराने विक्री होत असल्याचे प्रकार दिसून आलेले आहेत.त्यामुळे या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलण्याचा निर्धार केल्याने बोगसगिरी कारणारांची आता खैर नाही.
अधिक माहिती अशी की, मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे अध्यक्षतेखाली दि. 19/06/2023 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स झाली आहे. यामध्ये बोगस / भेसळयुक्त खते, बियाणे, किटकनाशके यांची विक्री करणे तसेच खते, बियाणे व किटकनाशकांची ज्यादा दराने विक्री करुन शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवण्याकरिता चर्चा करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यामध्ये कोठेही अनधिकृतरित्या खते, बियाणे व किटकनाशकांची विक्री करताना आढळल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच बोगस अथवा भेसळयुक्त खते, बियाणे व किटकनाशकांची विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा बियाणे उगवले नाही तर त्याची विक्री करणारे संबंधितांवर शेतकऱ्यांच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात येईल.
दरम्यान, बीड जिल्ह्यामध्ये वरीलप्रमाणे काही गैरव्यवहार, फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी. बीड जिल्हा पोलीस दल शेतकऱ्यांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे. शेतकरी व सुजाण नागरिकांनी याबाबत दक्ष राहून पोलीसांना सदर गैरप्रकार रोखण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी एका प्रशिधीपत्रकाद्वारे केले आहे.