Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - मनुवादी विकृतीचे सांस्कृतिक आक्रमण

प्रजापत्र | Tuesday, 30/05/2023
बातमी शेअर करा

बहुजन चेतना म्हणून जे काही आहे, त्या चेतनांचा अवमान करायचा, प्रसंगी त्या बाजूला करायच्या आणि राष्ट्राचा स्वाभिमान म्हणून मोजक्याच्या व्यक्ती देशाच्या माथी मारायच्या असले कारस्थान करणारी मानसिकता या देशातील बहुजन समाजाला कायम उपेक्षित ठेवत आली आहे. या मानसिकतेला जे कोणी मेघपुरुष वाटतील त्यांचाच उदोउदो करायचा आणि त्यासाठी प्रसंगी बहुजन समाजातील प्रेरणांना दुर्लक्षित करायचे या विकृतीच्या हाती सध्या सत्ताकेंद्रे आहेत, आणि याच विकृतीतून सावरकरांचा उदोउदो करण्यासाठी सावत्रीमाई, अहिल्यादेवी यांची शिल्पे हटविण्याची सडकी वृत्ती सध्या देश पाहतो आहे. प्रश्न इतकाच आहे, की या सांस्कृतिक आक्रमणाचा मुकाबला बहुजन समाज कसा करणार आहे?

 

 

इतिहास मग तो कोणत्याही देशाचा असो, संस्कृतीचा असो, त्यात सर्वच समाजघटकांचे आणि व्यक्तींचे योगदान असते. हे योगदान कमीअधिक असू शकते, पण म्हणून एखाद्या व्यक्तीचा गौरव करण्यासाठी इतरांना बाजूला सारणे याला संस्कृती किंवा राष्ट्राभिमान नक्कीच म्हणता येणार नाही, ही तर सडक्या मनुवादी मानसिकतेतून निर्माण झालेली विकृती आहे. त्याचाच प्रत्यय सध्या देशात येत आहे. सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी महाराष्ट्र सदनातील अहिल्यादेवी आणि सावित्रीमाई यांची शिल्पे बाजूला करण्याचा प्रकार हा कोणालाही संताप आणणारा आहे.

 

     सावरकर यांचे देशाच्या उभारणीतील योगदान यावर मतमतांतरे आहेत. त्याबद्दल काही भाष्य करण्याची आवश्यकता नाही. तरीही सावरकर हे महाराष्ट्राचे होते, आज जे सरकारमध्ये बसलेले आहेत, सावरकर ही त्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांना जर महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करायची असेल तर त्यात गैर असे काही नाही, किंवा कोणी आक्षेप घ्यावे असेही काही नाही, मात्र ही जयंती साजरी करताना महाराष्ट्र सदनातील अहिल्यादेवी आणि सावित्रीमाई यांची शिल्पे हटविण्याचा जो निंदाव्यंजनक प्रकार घडला आहे, तो या महाराष्ट्राच्या बहुजन समाजाशी सत्तेने केलेला द्रोह आहे. इतरवेळी स्वतःच्या सत्ताकारणासाठी हिंदुत्वाचा उदोउदो करताना मंदिर पुनर्निर्माणसाठी अहिल्यादेवींचे उदाहरण देणारे लोक सावरकरांसाठी अहिल्यादेवीचे शिल्प बाजूला करतात यातूनच यांची मानसिकता आणि यांचा खरा चेहरा समोर येतो.

 

अहिल्यादेवी होळकर यांची राज्यपद्धती या महाराष्ट्रातील बहुजन समजाला प्रेरणा देणारी होती. एक महिला राज्यकर्ती विविध आव्हाने पेलत, प्रसंगी पेशवाई वरवंटा आलेला असतानाही, राज्य राखते हा खऱ्याअर्थाने बहुजन समाजासाठी प्रेरणेचा विषय आहे. सावित्रीमाईबद्दल तर बोलायलाच नको, महिलांच्या उत्थानासाठी , शिक्षणासाठी फुले दाम्पत्याने काय हाल अपेष्टा सोसल्या आणि त्यांना कोणत्या दिव्यातून जावे लागले हे महाराष्ट्र जाणतो. त्यामुळेच अहिल्यादेवी काय, सावित्रीमाई काय, हे या महाराष्ट्राच्या बहुजन अस्मितांचे, बहुजन सामर्थ्याचे प्रतिक आहे. आणि आज त्याच प्रतिकांना सावरकरी सन्मानासाठी बाजूला केले जाते, हा महाराष्ट्रातील बहुजन समाजाचा अपमान आहे.

 

एकीकडे देशाच्या संसदेच्या उदघाटनाच्या निमित्ताने राजदंडासारखा भंपकपणा करून संसदेला एका धर्माचे प्रतिक देण्याचा प्रयत्न केला जातो, तर त्याचवेळी महाराष्ट्र सदनातून बहुजन अस्मिता असणारी प्रतिके हटविली जातात, हे खऱ्या अर्थाने या बहुजन महाराष्ट्राच्या सर्वसमावेशी संस्कृतीवर केलेले अतिक्रमण आहे, हा प्रकार म्हणजे पुन्हा एकदा या महाराष्ट्रावर वर्ण वर्चस्व गाजविण्याचा, थोपण्याचा प्रकार आहे. एकीकडे हिंदू शब्दात आम्ही सर्वांचा समावेश करतो असे म्हणायचे आणि त्याचवेळी बहुजन अस्मितांसोबत मात्र द्रोह करायचा हा दुटप्पी कावा मनुस्मृतीच्या विकृत मानसिकतेतूनच आलेला आहे, आणि आज ना उद्या बहुजन समाजाला याबद्दल गांभीर्याने विचार करावा लागेल. सावरकर ज्यांना आदर्श वाटतात, त्यांनी आपल्या आदर्शांची कवने गायलाही हरकत नाही. त्यांना ते स्वातंत्र्य संविधानानेच दिलेले आहे, मात्र अशी कवने गाताना या महाराष्ट्रातील बहुसंख्य बहुजन समाजाच्या अस्मिता पायदळी तुडविण्याचा अधिकार सत्तेला देखील नाही आणि जर सत्तेच्या मस्तीत मूठभर लोक पुन्हा एकदा बहुजन चेहरा पुसण्याचे काम करणार असतील तर आता बहुजन समाजानेही त्यांच्या हाती सत्ता किती दिवस ठेवायची आणि त्यांच्या धार्मिक ध्रुवीकरणाला किती बळी पडायचे हे ठरवायला हवे.
 

Advertisement

Advertisement