Advertisement

खून, जबरी चोरी, अपहरण प्रकरणातील फरार सराईत गुन्हेगार अमोल मुंडेस अखेर अटक

प्रजापत्र | Monday, 29/05/2023
बातमी शेअर करा

धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील 2021 मध्ये तरुणाचे अपहरण करून त्याचा निर्दयपणे खून करणाऱ्या फरार सराईत गुन्हेगार अमोल मुंडे यास अटक करण्यात धाराशिव पोलिसांना यश आले आहे. आरोपी मुंडेंस न्यायालयात हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक १८ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री इसम नामे कृष्णा शिवशंकर कोरे, वय २३ वर्षे, रा. गणेशनगर, धाराशिव यास ढोकी येथून उस्मानाबाद येण्यासाठी अज्ञात व्यक्तींनी त्यांचे वाहनामध्ये बसवुन ढोकी ते उस्मानाबाद येत होता. मौजे शिंगोली गावाचे शिवारात गड देवधर पाटी जवळ कोणत्यातरी कारणावरुन त्याचा घातपात करुन पुरावा नष्ट करण्यासाठी कृष्णा याचे कपडे काढुन त्याचे प्रेत मोकळ्या पटांगणात गवतात फेकुन दिले होते. सदर इसम हरवल्याबाबत पोलीस ठाणे ढोकी येथे नोंद करण्यात आली होती. 

 

 

गड देवधर पाटी जवळ प्रेत मिळाल्यावरुन पोलीस ठाणे आनंदनगर जि. धाराशिव येथे आकस्मात मृत्यु दाखल करण्यात आला होता. सदर मयत व पोलीस ठाणे ढोकी येथे हरवलेल्या व्यक्तीच्या तक्रारीमधील तक्रारकर्ते यांचा डी.एन. ए जुळुन आल्याने पोलीस ठाणे आनंदनगर येथे अज्ञात इसमांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. 

 

सदर गुन्हयाचे तपासामध्ये तीन आरोपी निष्पन्न झाले होते. त्यापैकी दोन आरोपी रमेश भगवान मुंढे, रा. कोयाळ, ता. धारुर जि. बीड, शिवशंकर हरिभाऊ इंगळे, रा. केज, ता. केज, जि. बीड यांना यापुर्वीच गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्याचा मास्टर माईंड मुख्य आरोपी नामे अमोल अशोक मुंढे हा घटना घडल्यापासुन फरार होता. त्यांच्यावर बीड, उस्मानाबाद, परभणी, पुणे अशा महाराष्ट्रातील विविध जिल्हयांत खुन, जबरी चोरी, विषारी पदार्थांच्या सहाय्याने दुखापत करणे, खंडणी व जबरी चोरी करता अपहरण करणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

 

राज्यातील अनेक जिल्ह्यांतील पोलीसांना तो पाहिजे असल्याने विविध ठिकाणचे पोलीस दले त्याचे मागावर होते. तो प्रचंड धाडसी व बेडर आहे. त्याचे गाव कोयाळ हे अत्यंत दुर्गम, डोंगराळ भागात असुन त्याची शेती गावापासुन दुर आहे तो परिसर दरी खोऱ्यांचा, दगड गोट्यांचा असुन तेथील परिसराची अमोल मुंढे याला चांगली माहिती असल्याने तो नेहमी जागा बदलुन राहत असे.

 

 पोलीसांची चाहुल लागताच तेथील भौगोलिक परिस्थितीचा गैरफायदा घेवुन तो त्याचे अस्तित्व लपवुन पोलीसांना वारंवार गुंगारा देत होता. कोयाळ गावात व आजुबाजुच्या गावांमध्ये त्याचे धाडसी व गंभीर गुन्हे करण्याच्या पार्श्वभुमीमुळे प्रचंड दहशत आहे. त्यामुळे त्याचे ठावठिकाण्याबाबत माहिती देण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते याच गोष्टीचा फायदा घेवुन अमोल मुंढे हा मागील दिड वर्षांपासुन फरार होता.

 

पोलीस ठाणे आनंदनगरचे अधिकारी व कर्मचारी हे गेल्या अनेक महिन्यांपासून त्याचे मागावर होते. मौजे कोयाळ येथे वारंवार पोलीस पथक जावुन गोपनिय माहिती व इतर माध्यमातुन त्याचा शोध घेत होते. दिनांक २७ मे २०२३ रोजी अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक उस्मानाबाद व नवनीत कांवत, अपर पोलीस अधीक्षक उस्मानाबाद यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस ठाणे आनंदनगरचे पोलीस पथक अमोल मुंढे याचे शोधकामी बीड जिल्ह्यातील कोयाळ, धारूर, परळी भागात गेलेले असताना त्यांना आरोपी अमोल अशोक मुंढे हा मौजे गोवर्धन ता. परळी या गावाचे शिवारात असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने त्यांनी शिवारात अमोल मुंढे याचा शोध घेवुन कॅनल लगतच्या एका शेतामध्ये त्याची मोटारसायकल दिसल्याने तो आसपास असण्याची शक्यता वाटल्याने तो पिंजुन काढुन सापळा रचुन त्याला शिताफीने ताब्यात घेतले व उस्मानाबाद येथे आणुन पोलीस ठाणे आनंदनगर येथे अटक केली

आहे.

 

 

Advertisement

Advertisement