बीड: जिल्हयात शनिवारी खा. संजय राऊत आणि शिवसेना (उबाठा) उपनेत्या सुष्मा अंधारे यांची महाप्रबोधन सभा होत आहे. त्या अगोदरच शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांमधील राडा समोर आला आहे. शिवसेना (उबाठा)जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी एक व्हिडिओ जारी करुन आपण सुषमा अंधारेंना दोन चापटा मारल्याचे म्हटले आहे. तर अंधारे मात्र असे काही घडलेच नसल्याचे सांगत आहेत.
शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा शनिवारी बीडमध्ये येत आहे. मात्र यात्रेपुर्वीच शिवसेना (उबाठा) मधील अंतर्गत वाद टोकाला पोहचले आहेत. सभास्थानाची पाहणी करताना शिवसेना (उबाठा) पदाधिकारी आप्पासाहेब जाधव आणि गणेश वरेकर यांच्यात वाद झाल्याचे आणि यातून वाहनांची तोडफोड झाल्याचे समोर आले होते. त्याला आता आणखीच धक्कादायक वळण मिळाले आहे.
या ठिकाणी शिवसेना (उबाठा) च्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनाच मारहाण झाल्याचे सांगितले जात आहे. जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याची माहिती असून स्वतः आप्पासाहेब जाधव यांनीच व्हिडिओ जारी करुन आपण अंधारेंना दोन चापटा मारल्याचे म्हटले आहे.
काय म्हटले आहे आप्पासाहेब जाधव यांनी..
जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे पक्षात दादागिरी करित असून पदाधिकाऱ्यांना पैसे मागत आहेत. पद विकत आहेत, आणि म्हणून आपण त्यांना दोन चापटा मारल्या असे म्हटले आहे.
तर अंधारे या मात्र असे काही घडलेच नसल्याचे सांगत आहेत. यामुळे महाप्रबोधन यात्रेला मात्र आगमनापुर्वीच गालबोट लागले आहे