मुंबई - मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात दूरध्वनी करून अभिनेता सलमान खानला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी १६ वर्षांच्या मुलाला ठाण्यातील शहापूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
एका व्यक्तीने सोमवारी रात्री मुंबई नियंत्रण कक्षाला फोन करून सलमान खानला ठार मारण्याची धमकी दिली. ‘मी ३० तारखेला सलमान खानला मारणार आहे, त्याला सांगा’, असे सांगून या व्यक्तीने दूरध्वनी बंद केला. आपले नाव रॉकी भाई, गौशाला रक्षक असून आपण राजस्थानमधील जोधपूर येथून बोलत असल्याचे त्याने सांगितले. याप्रकरणी तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी तपास केला असता दूरध्वनी करणारी व्यक्ती ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधील डोळखांब येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक शहापूरला गेले. पोलिसांना पाहताच तो दुचाकीवरून पळ काढत होता. पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्यानेच धमकीचा दूरध्वनी केल्याचे निष्पन्न झाले. अखेर पुढील तपासासाठी या मुलाला आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.