Advertisement

आज या भागात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

प्रजापत्र | Friday, 31/03/2023
बातमी शेअर करा

राज्यात पावसाला पोषक हवामान निर्माण झाले आहे. आज विदर्भात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात विजांसह पावसाची शक्यता आहे. मात्र सध्या उन्हाचा चटका वाढल्याचे दिसून येत आहे.

 

 

हवामान विभागाकडून येणारे 2 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात कोसळलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. गेल्या काही दिवसात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन हवामान विभागाकडून केले जात आहे.

 

 

याठिकाणी वादळी वाऱ्याचा अंदाज
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात विजांसह पावसाची शक्यता आहे. तसेच उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले असून आज विदर्भात 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली याठिकाणी वादळी वाऱ्याचा अंदाज आहे.

 

 

तापमानातही चांगलीच वाढ
यासोबतच राज्यातील तापमानातही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढला आहे. रस्ते निर्मनुष्य दिसू लागली आहेत. राज्यात कमाल तापमान 34 ते 37 अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानातही चांगलीच वाढ झाली असून, बहुतांश ठिकाणी पारा 15 ते 26 अंशांच्या दरम्यान आहे.

 

 

याठिकाणी हलक्या सरी
मुंबई व उपनगरे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, गोंदिया, वाशिम, गडचिरोलीसह 11 जिल्ह्यामध्ये दोन दिवस पावसाच्या हलक्या सरी कोसळणार आहेत. मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरसह अन्य ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.

Advertisement

Advertisement