पाटोदा: शहरातील पुल कम बंधाऱ्याच्या कथीत बनावट तांत्रिक मान्यता प्रकरणात पोलीसांनी अखेर पाटोदा नगरपंचायतच्या तत्कालीन कार्यालयीन अधिक्षकास अटक केली आहे. सय्यद वाजेद अली हे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून या अटकेमुळे आता इतरांचे धाबे दणाणले आहेत.
पाटोदा शहरातील पुल कम बंधाऱ्याच्या कामासाठी अधिक्षक अभियंता कार्यालयाचे बनावट तांत्रिक मान्यता आदेश वापरल्याचे समोर आले होते. या प्रकरणात अबलुक घुगे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर पाटोदा पोलीसात याबाबत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. नंतरच्या काळात या प्रकरणाचा तपास थंडावला. याबाबत मागील सुनावणीत उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत पोलिसांवर ताशेरे ओढले आणि प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा तपास आष्टीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांच्या कडे दिला होता. धाराशिवकर यांनी या प्रकरणाची चौकशी सुरु करुन काही कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा पाटोदा नगरपंचायतच्या तत्कालीन कार्यालयीन अधिक्षक सय्यद वाजेद अली याला अटक केली. आता त्याच्या अटकेनंतर या प्रकरणात आणखी कोणा कोणाची नावे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
प्रजापत्र | Tuesday, 28/03/2023
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा