बीड : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराने आमचा फोटो देखील टाकला नाही असे म्हणत 'रुसू बाई रुसू ' च्या भूमिकेत गेलेल्या शिवसंग्रामने अखेर मन मोठे करत, सारा अपमान गिळत भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे आतापर्यंत आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांचे 'हसू 'होत असतानाच बोराळकर यांच्या चेहऱ्यावर मात्र हसू येणार आहे.
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी १ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सतीश बोराळकर यांच्या बॅनरवर शिवसंग्रामचा उल्लेख नव्हता, किंवा आ. विनायक मेटे यांच्या फोटोलाही स्थान नव्हते. त्यामुळे शिवसंग्राम रुसून बसला होता. भूमिका घेण्यासाठी आ. विनायक मेटे यांनी बैठक देखील घेतली होती. आणि भूमिका निश्चित करण्यासाठी २५ तारीख ठरवली होती. मात्र त्यांनी २५ च्या ऐवजी २८ रोजी निर्णय घेतला असून मानापमान नाट्य विसरून आ.मेटे यांनी शिरीष बोराळकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
दरम्यान शिवसंग्राम आणि भाजपमधील ताणतणाव नवीन नाहीत, भाजपकडून आपला मान राखला जात नसल्याचे आ. विनायक मेटे अनेकदा बोलतात, धडा शिकवू असेही सांगतात, मात्र ऐनवेळी युतीधर्म म्हणून भाजपची साथ देतात असा अनुभव राहवे. त्यामुळे आतापर्यंत भाजपसोबत मांडलेला 'संग्राम'म्यान करत शिवसंग्राम बोराळकर यांच्या मागे उभा राहणार आहे.
बातमी शेअर करा