पंढरपूर :राज्यात करोना रुग्ण वाढत असल्याने पुन्हा एकदा लॉकडाउन होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात करोनाची दुसरी लाट येण्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा असं आवाहन वारंवार राज्य सरकारकडून केलं जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील यावेळी लाट नाही तर त्सुनामी येईल अशी भीती व्यक्त केली आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाउनसंबंधी महत्वाचं विधान केलं आहे. अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
अजित पवार यांनी लॉकडाउनला विरोध दर्शवला आहे. गोरगरिबांचे हाल करणाऱ्या लॉकडाउनचे नावही नको असं ते म्हणाले आहेत. “गेल्या नऊ महिन्यापासून हातावर पोट असलेल्या बारा बलुतेदारांची अवस्था फारच बिकट झाली आहे. लॉकडाउनमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्यांना मोठा फटका बसत आहे. तरीही केंद्र आणि राज्य सरकारने ज्या ज्या वेळी लॉकडाउन घोषित केले तेव्हा सर्वांनी निमूटपणे आदेश पाळला,” असं अजित पवारांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी काळजी घेण्याचंही आवाहन केलं. यावेळी अजित पवारांनी पांडुरंगाने जे दिलंय त्यात समाधान मानावे आणि पुढे चालावे सांगत आपण उपमुख्यमंत्री पदावर समाधानी असल्याचं सांगितलं.
प्रजापत्र | Thursday, 26/11/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा