Advertisement

जे करायचे ठाम करा, शिक्षण क्षेत्रातला गोंधळ थांबवा

प्रजापत्र | Sunday, 22/11/2020
बातमी शेअर करा

बीड : कोरोना महामारीचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला असला तरी शिक्षण क्षेत्र यामुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहे.  विद्यापीठांच्या परिक्षांवरून निर्माण झालेला गोंधळ अद्याप ताजा असतानाच आता 9 ते 12 वीचे वर्ग आणि त्याला जोडून आयटीआयच्या परीक्षा यावरून राज्यात गोंधळाचे वातावरण आहे. कोठे शाळा सुरु होणार आहेत तर कोठे होणारच नाहीत,शिक्षकांच्याच कोरोना चाचण्यांचा ताण प्रयोगशाळांवर असतानाच आता विद्यार्थ्यांचाही तपासण्या होणार आहेत, हेसर्व साधायचे कसे हा प्रश्न शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना आहे. दुसरीकडे आयटीआयच्या परीक्षा सुरु होत आहेत, मात्र अजूनही अनेक आयटीआयमध्ये कोव्हीड सेंटर कार्यरत असून त्या ठिकाणी रुग्ण आहेत, मग परीक्षा होणार कशा ? या सर्व गोंधळात विद्यार्थी संभ्रमित होत आहे. सरकारने हा गोंधळ थांबवून ‘जे करू, ठाम करू’ चे शब्द खरे करावेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
राज्यातील महाविकास आघाडीच्या कार्यपद्धतीतीळ धोरणांचा गोंधळ थांबायला तयार नाही. आता हा गोंधळ शिक्षण क्षेत्रात सुरु झाला आहे. राज्यातील शाळा अनेक महिन्यांपासून बंद आहेत. आता सोमवारपासून 9 ते 12 चे वर्ग सुरु करण्याचा निर्णय शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केला. एकीकडे कोरोनाचे आकडे वाढत असताना शाळा सुरु करायच्या की नाही, यावर ठाम निर्णय अपेक्षित होता, मात्र शिक्षण मंत्र्यांचा गोंधळ थांबायला तयार नाही. शाळा सुरु करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देऊन शिक्षण मंत्री मोकळ्या झाल्या. आता मुंबई, ठाणे, औरंगाबाद अशा महापालिका शाळा सुरु करणार नाहीत, मात्र ग्रामीण भागातील शाळा सुरु होणार . आता औरंगाबाद सारख्या जिल्ह्यात असा भेदभाव का ? या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही. अगोदर शिक्षकांच्या कोरोना चाचण्या होणार होत्या, आता विद्यार्थ्यांचाही करायच्या आहेत, पण निर्णय पुन्हा स्थानिक पातळीवर. स्थानिक पातळीवर अधिकार दिले की काय होते याचा अनुभव अनेक बाबतीत मागच्या काही महनियत आलेला आहे. आता शिक्षण क्षेत्रात तरी एकसुरीपणा यायला हवा, त्यासाठी ठाम निर्णय गरजेचे आहेत.
जे शालेय शिक्षणाचे, ते आयटीआयचे. राज्यातील आयटीआयमध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील, आणि गरीब वर्गातील विद्यार्थी असतात . आता आयटीआयच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. मात्र अनेक ठिकाणच्या आयटीआयमध्ये कोव्हीड सेंटर सुरु करण्यात आलेले आहेत.बीड सारख्या जिल्ह्यात आजही बीड आणि आष्टी येथील आयटीआयमध्ये असणार्‍या कोव्हीड सेंटरमध्ये रुग्ण आहेत, मग तेथे परीक्षा होणार कशा ? अशी परिस्थिती राज्यातील अनेक ठिकाणी आहे. मग याचे नियोजन काय? फडणवीस सरकारच्या काळात कोणत्याही गोष्टीचा ’अभ्यास’ बराच काळ चालायचा, आता ठाकरे ’जे करू , ठाम करू ’ म्हणत आहेत, मात्र शिक्षणाच्या बाबतीत सारे गोंधळाचे चित्र आहे, ते सरकारने थांबवावे अशी विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांचीच अपेक्षा आहे. 

 

Advertisement

Advertisement