पंढरपूरला देवदर्शनासाठी जाणारी भाविकांची बस हुलजंती ते मंगळवेढा रोडवरील येड्राव फाटा येथे पलटी होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात 29 जण किरकोळ जखमी झाले आहेत, हा अपघातात सकाळी बुधवारी दि 18 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास घडला आहे.
काय आहे घटना ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश येथील खासगी ट्रॅव्हल्स बस क्र.UP-FT-8283 मधून काही भाविक देवदर्शनाला निघाले होते. हे भाविक कर्नाटकातील देवदर्शन उरकून पंढरपूरला निघाले होते. यादरम्यान हुलजंती ते मंगळवेढा रोडवर येड्राव फाटा येथे आल्यानंतर चालकाचा ताबा सुटल्याने बस उलटली. या दुर्घटनेत 1 जण ठार, तर इतर 36 जण जखमी झाले. याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे, दत्तात्रय येलपले यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
जखमींची प्रकृती स्थिर
अपघातानंतर थंडी असताना देखील आसपासच्या भागातील नागरिकांनी अपघातग्रस्त भाविकांना उपचारासाठी मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यासाठी मदत केली. गंभीर जखमींना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.