महाराष्ट्रातील कोरोनाचे आकडे कमी होवू लागल्यामुळे आता कोरोना संपला अशा पद्धतीने लोक वागत आहेत. जगातील अनेक देशांमध्ये सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. दिल्लीसारख्या ठिकाणी तर तिसरी लाट येत असल्याचे सरकारमधील मंत्री म्हणत आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाच्या दुसर्या लाटेपासून महाराष्ट्र अपवाद राहिल असे कोणी समजून घेवू नये. मात्र महाराष्ट्रात कोरोनाची ही लाट साधारणः जानेवारी, फेब्रूवारी महिन्यात येईल असे अपेक्षीले जात होते. प्रत्यक्षात मात्र या आठवड्यातील आकडेवारीवर नजर टाकली तर कोरोना रूग्णांची संख्या वाढायला पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे. त्यामुळे ही वाढती रूग्णसंख्या दुसर्या लाटेचे संकेत आहेत असेच म्हणावे लागेल. ज्या ठिकाणी आकडे कमी दिसत आहेत. त्या ठिकाणी तपासण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र एकंदरीत पॉझिटीव्हीटीरेट पाहिला तर तो अजूनही दहा टक्क्याच्या पुढे आहे ही बाब अत्यंत गंभीर आहे.
केंद्र आणि राज्य सरकारांनी नोव्हेंबर महिन्यात लॉकडाऊनचे नियम बर्यापैकी शिथील केले. त्यातच दिवाळी सारखा सण असल्याने ठिकठिकाणी गर्दी झाली. आतातर प्रार्थना स्थळे देखील उघडले आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी गर्दी होणे अपेक्षीतच आहे. अर्थात टाळेबंदी हा कोणत्याच समस्येवरचा कायमस्वरूपी उपाय नाही. त्यामुळे रोगाचे गांभीर्य कितीही असले तरी आज ना उद्या व्यवहार सुरू करणे भाग होते. त्यामुळे व्यवहार सुरू करण्यात चुकीचे असे काही नाही. फक्त आता जनतेने कोरोनाला गांभीर्याने घ्यायची गरज आहे. मागच्या सात, आठ महिन्यात कोरोनाने जे रूप दाखविले आहे ते पाहता हा रोग हलक्याने घ्यावा असा नक्कीच नाही. घाबरून जावू नये पण आम्हाला काहीच होत नाही ही मानसिकता उद्या अंगाशी येणारी ठरेल.
दिवाळीच्या वेळी बाजारपेठेत जी गर्दी उसळली त्यातील उत्साहाचा भाग सोडला तर जी बेफिकीरी या गर्दीने दाखविली ती चिंताजनक आहे. अजूनही लोक मुखपट्टी वापरायला तयार नाहीत. मुखपट्टी वापरने म्हणजे काही तरी चुकीचे करणे असा समज असणारा एक मोठा वर्ग स्वतः सोबतच इतरांच्या आरोग्याला धोका निर्माण करत आहे. त्यामुळे प्रशासनाने देखील आता विनंती आणि आवाहानापलिकडे जावून कठोर कारवाईच्या पातळीवर उतरण्याची गरज आहे. गर्दीच्या ठिकाणी लोक सर्रास मुखपट्टी न वापरता फिरत असतात. दुचाकी आणि चारचाकी मधून जाताना भररस्त्यावर पिचकार्या मारत असतात. आपल्या या कृतीने आपण समाजाच्या आरोग्याशी खेळत आहोत याची थोडीही जाणीव या कोणाच्याच मनात नाही. खरेतर अशा पद्धतीने वागणारे लोक समाजद्रोही आहेत असेच म्हणावे लागेल. निव्वळ चार पाचशे रूपयांचा दंड आकारून त्यांची सुटका करणे हा यावरचा मार्ग असणार नाही तर अशा व्यक्तींना कठोरातील कठोर शासन करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा वापर प्रशासनाने करावा. शारिरीक अंतराचे सर्व नियम मागच्या काळात मोडले गेले आहेत. अगदी एसटी महामंडळही त्याला अपवाद राहिलेले नाही. निम्म्या क्षमतेने बस चालविणे अपेक्षीत असताना अक्षरशः सर्व सीट भरल्यानंतर प्रवाशांना मध्ये उभे करून एसटी बस महाराष्ट्रभर धावत असल्याचे चित्र दिवाळीत पहायला मिळाले. ही सारी बेफिकीरी कोरोनावाढीला आमंत्रण देणारी ठरेल.
राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी देखील कोरोनाचा महास्फोट होण्याचा इशारा दिला आहे. दुसरी लाट किती तीव्र असेल या बद्दल आजच काही सांगता येणार नाही मात्र हा महास्फोट झाला आणि तो पहिल्यापेक्षा अधिक वेगाने झाला तर काय करायचे हा प्रश्न सर्वांसमोर आहे. त्यामुळे अशा कठीण काळात प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखण्याची गरज आहे. आता लोकांना घरात बसा हे सांगता येणार नाही, ते व्यवहार्य ठरणार ही नाही पण किमान सुरक्षीत राहण्यासाठीचे साधे साधे उपाय प्रत्येकाने करावेत आणि प्रशासनाने देखील ते करून घ्यावेत इतकेच.
बातमी शेअर करा