Advertisement

अंबाजोगाईत निघाला भव्य हिंदु धर्मरक्षण मोर्चा

प्रजापत्र | Tuesday, 10/01/2023
बातमी शेअर करा

 

अंबाजोगाई - लव्ह जिहाद व बळजबरीने धर्मांतर वाढत असल्याने लव्हजिहाद व धर्मांतर विरोधी कायदा संपूर्ण देशात लागू करण्यात यावा. गोहत्या रोखण्यात याव्यात. या प्रमुख मागण्यांसाठी मंगळवारी अंबाजोगाईत भव्य हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चा निघाला होता. मंगळवारी सकाळी हा मोर्चा कुत्तरविहिर परिसरातील तानाजी मालुसरे चौकातून निघाला. यावेळी मध्यवर्ती हनुमान मंदिरात महाआरती करून मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोंचला.यावेळी मोर्चातील निवडक प्रतिनिधींनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांना दिले. सदरील मोर्चा हा माता भगिनींच्या रक्षणासाठी, गोमातेच्या संवर्धनासाठी आणि धर्माच्या रक्षणासाठी निघाला होता. लव्ह जिहाद व बळजबरीने धर्मांतर वाढत असल्याने लव्हजिहाद व धर्मांतर विरोधी कायदा संपूर्ण देशात लागू करण्यात यावा. गोहत्या रोखण्यात याव्यात. अशा विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या मोर्चात अंबाजोगाई तालुक्यातील हिंदू समाजबांधव, महिला व युवकांचा मोठा सहभाग होता.

 

 

भगवे झेंडे, भगव्या टोप्यांनी वेधले लक्ष

आज अंबाजोगाईत निघालेल्या भव्य अश्या हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चात प्रत्येक मोर्चेकऱ्याने आपल्या डोक्यावर भगवी टोपी परिधान केली होती. तर मोर्चातील मोठमोठे भगवेझेंडे लक्षवेधी ठरले.

 

मोर्चात गोमातेचे दर्शन

 

अंबाजोगाई शहरातून निघालेल्या मोर्चात अनेक शेतकरी व पशुपालकांनी आपल्या गाई ही मोर्चात सोबत घेऊन येत. पशुपालन व गोमतेचे रक्षण व संवर्धनाचा संदेश दिला.

 

कडेकोट पोलीस बंदोबस्त

अंबाजोगाई शहरातून निघालेल्या हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चासाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.मोर्चासोबत पोलीस पथकाची एक तुकडी बंदोबस्तासाठी ठेवण्यात आली होती

 

 दुकाने बंद ठेऊन व्यापारी मोर्चात

मंगळवारी सकाळी अंबाजोगाई शहरातून निघालेल्या हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चाच्या निमित्ताने शहरातील बसस्थानक परिसर,मंडीबाजार,मंगळवारपेठ, गुरुवारपेठ, कुत्तरविहीर व शहरातील अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे आपली दुकाने बंद ठेवली होती. व मोर्चातही सहभाग नोंदवला होता.

Advertisement

Advertisement