Advertisement

ठाण्यात भाजपा पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला

प्रजापत्र | Friday, 30/12/2022
बातमी शेअर करा

ठाणे-वागळे इस्टेट येथील परबवाडी भागात भाजपाच्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच हा हल्ला शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा आरोप ठाण्यातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यासंदर्भात भाजपाने ट्वीट करत माहिती दिली आहे.

   भाजपाचे पदाधिकारी प्रशांत जाधव हे ठाण्यातील परबवाडी परिसरात राहतात. गुरुवारी या भागात फलक बसविण्याच्या कारणावरून बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपाचे प्रशांत जाधव यांच्यात वाद झाला. या प्रकारानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना समज दिली होता. त्यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणाहून निघून गेले. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी अचानक १५ ते २० जणांच्या जमावाने प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला. या घटनेत त्यांच्या डोक्यास गंभीर इजा झाली असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

या घटनेनंतर ठाण्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले यांनी केल्याचा आरोप केला आहे. त्यांसदर्भात ‘भाजप ठाणे’ या खात्यावरून ट्वीटही करण्यात आले आहे. रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. याप्रकारानंतर ठाण्यात दोन्ही पक्षांमधील अंतर्गत धूसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असल्याची चर्चा आहे.

Advertisement

Advertisement