Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - वारकरी संप्रदायात मंबाजींचे काय काम

प्रजापत्र | Friday, 16/12/2022
बातमी शेअर करा

व्यवस्थेच्या विरोधात बंड करणे आणि वंचितांचा आवाज होणे हा भागवत संप्रदायाचा, महाराष्ट्राचे वैभव असलेल्या वारकरी संप्रदायाचा पाया आहे. जी व्यवस्था सामान्यांचे जगणे नाकारते , त्या व्यवस्थेविरुद्ध प्रहार करताना या व्यवस्थेने संतांना देखील सोडले नाही.मात्र असे असतानाही संतांनी 'कोणाही जीवाचा न घडो मत्सर ' हाच संदेश दिला. आज स्वतःला वारकरी संप्रदायातील म्हणविणारे ज्या भाषेत सुषमा अंधारेंवर टिका करीत आहेत, ना ती भाषा वारकरी संप्रदायाला शोभणारी आहे, ना तो आक्रस्ताळेपणा ना ते राजकारण. स्वतःला धर्माचे ठेकेदार म्हणविणाऱ्या या मंबाजींना वारकरी  संप्रदायाने कधीच मान्यता दिली नव्हती, आताही आधुनिक मंबाजी स्वतःला वारकरी म्हणवीत आहेत, मात्र त्यांच्या राजकारणासाठी त्यांना वारकरी धर्म वापरता येणार नाही. विद्रोहाच्या या संप्रदायात सत्ताळलेल्या 'मंबाजीं' चे काय काम ?
 

 

सुषमा  अंधारे यांच्या एका जुन्या भाषणातील विधानांवरून आता स्वतःला वारकरी म्हणविणारे त्यांच्या विरोधात रान उठवीत आहेत. सुषमा अंधारे यांनी जे वक्तव्य केले त्याच्याशी आम्ही सहमत आहोतच असेही नाही , मात्र एका जुन्या वक्तव्यावरून आज जे रान पेटविले जात आहे आणि स्वतःला वारकरी म्हणून मिरविणारे ज्या पद्धतीने याचे राजकारण करीत आहेत, ते वारकरी संप्रदायात बसणारेच नाही. खरेतर आज जे लोक अंधारेंवर अश्लाघ्य टीका करीत आहेत , त्यांना तरी वारकरी संप्रदाय कळला आहे का ? सुषमा अंधारेंचे शब्द वेगळे असतीलही कदाचित, पण येथल्या व्यवस्थेने पिढ्यानपिढ्या उपेक्षित, वंचित, स्त्रिया यांचे जगणे नाकारले होतेच ना, त्यांना शिक्षण नाकारले होतेच ना, ज्या राष्ट्रसंत तुकारामांनी जगाला शहाणे करण्याचा प्रयत्न केला, त्या तुकारामांच्या  ओव्यांना इंद्रायणीत बुडविले होतेच ना, ज्ञानोबांना आणि त्यांच्या भावंडांना छळणारे इथल्या व्यवस्थेतले स्वतःला धर्माचे ठेकेदार म्हणविणारे धर्ममार्तंडच होते ना? त्या त्या काळात, त्या त्या संतांनी येथील विषमतावादी व्यवस्थेवर प्रहार केले होतेच ना. मुळात वारकरी संप्रदाय अस्तित्वात आला तोच सामान्यांना कर्मकांडात अडकविणाऱ्या व्यवस्थेला विरोध म्हणून, म्हणजे विद्रोह हाच या संप्रदायाचा पाया आहे, असे असताना आज समाजातील विषमतेला, व्यवस्थेच्या मनमानीला , सत्तेच्या हुकूमशाहीला विरोध करण्याचे धारिष्ट्य स्वतःला 'कीर्तनकार ' म्हणविणारे दाखवीत आहेत काय?
सुषमा अंधारेंच्या ज्या वक्तव्यावरुन आज रान उठविले जात आहे, ते काही आजचे वक्तव्य नाही , मग आताच ते वक्तव्य समोर का आणले गेले ? सुषमा अंधारेंचा निषेध करणे देखील एकवेळ ठीक म्हणता येईल, जसे सुषमा अंधारेंना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तसेच त्यांच्या वक्तव्यांचा निषेध करण्याचे स्वातंत्र्य देखील इतरांना असायलाच हवे. मात्र जर हा निषेध करणारे स्वतःला वारकरी म्हणवत असतील, तर 'अंधारे ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाला मी मतदान करणार नाही, कोणीच करू नये ' हा वारकरी संप्रदायाचा विचार कसा असू शकेल? वारकरी या पवित्र नावाच्या आडून हा 'राजकीय फड 'कोणाच्या इशाऱ्यावर रंगविला जात आहे .
ज्या एकनाथांनी त्यांच्या अंगावर थुंकणारालाही कधी बोल लावला नाही, ज्या मुक्ताईंनी ज्ञानोबांना देखील
 ' संत जेणे व्हावे। जग बोलणे सोसावे।।
तरीच अंगी थोरपण। जया नाही अभिमान।।’’
‘‘योगी पावन मनाचा। साही अपराध जनाचा।।
विश्व झालिया वन्ही। संतमुखे व्हावे पाणी।।
शब्दशस्त्रे झाले क्लेश। संती मानावा उपदेश।।
विश्व परब्रह्म दोरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा'
हा संदेश दिला , ज्या वारकरी संप्रदायाने 'कोणाही जिवाचा न घडो मत्सर ' हेच सर्वेश्वर पूजनाचे 'वर्म' सांगितले, त्या ज्ञानोबा , तुकोबांचे नाव घेऊन एखाद्या महिलेला 'म्हसाड ' म्हणणे किंवा इतर प्रांण्यांची नावे देणे कोणत्या धर्मात बसते ? हे करणारे वारकरी कसे असू शकतात ? हे तर आधुनिक मंबाजीच आहेत. स्वतःला वारकरी म्हणविणारे त्या आडून संघाळलेले  राजकारण करणार असतील आणि राजकीय फडच रंगविणार असतील, तर यांनाही वारकरी संप्रदायाचे 'वर्म ' समजावून सांगण्याची वेळ आली आहे.
ज्या ज्या वेळी येथील व्यवस्था सामान्यांवर अन्याय करते , त्यावेळी या व्यवस्थेविरुद्ध बंडखोरी करण्याऐवजी 'बिदागीची ' गुळणी धरुन गप्प बसणारे, विषमतेच्या, अन्यायाच्या व्यवस्थेविरुद्ध बंड करु न शकणारे खरोखर स्वतःला वारकरी संप्रदायाचे पाईक म्हणायला पात्र आहेत का ? कोणताही  संप्रदाय हायजॅक करू पाहणारे हे आजचे 'मंबाजी ' आहेत , पण वारकरी संप्रदायाने असेल किंवा समाजाने असेल, असले 'मंबाजी ' कधी स्वीकारलेले नाहीत. यांच्या निषेधामागचे राजकारण आता स्पष्ट झालेले आहे. म्हणूनच असल्या मंबाजींना
अखंड जयाला, देवाचा शेजार ।
का रे अहंकार, नाही गेला ।।
मान अपमान, वाढविसी हेवा।
दिवस असता दिवा, हाती घेसी ।।
कल्पतरू तळवटी, इच्छिले ते गोष्टी ।
अद्यापि नरोटी राहिली का हाती ।।
असे विचारण्याची वेळ आली आहे.

 

Advertisement

Advertisement