'तर मला बेळगावात यावं लागेल' असा इशारा वयाची ऐंशी वर्ष ओलांडलेल्या व्यक्तीने दिल्यानंतर सत्तेला बसणारे हादरे असतील, किंवा लोकनेत्याच्या अकाली निधनाच्या आठ वर्षानंतरही 'आज गोपीनाथराव असते तर' या शब्दांनी राजकीय , सामाजिक गणिताची मांडणी करीत त्यांची आठवण काढली जाते, यातच शरद पवार आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे या दोघांचेही महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणात असलेले योगदान स्पष्ट होणारे आहे. महाराष्ट्र घडविण्यात राजकीय परिघातील ज्या काही मोजक्या व्यक्तींचा मोठा वाटा राहिलेला आहे, त्यात शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांचे योगदान निश्चीतच मोठे आहे.
ज्या ज्या वेळी देशाला किंवा समाजाला एक वैचारिक, राजकीय नेतृत्व देण्याची गरज प्रकर्षाने जाणवली, त्या त्या वेळी ती गरज महाराष्ट्राने पूर्ण केली ही महाराष्ट्राची प्रगल्भ राजकीय, सामाजिक परंपरा आहे. शरद पवार असतील किंवा गोपीनाथ मुंडे, हे दोघेही या परंपरेचे वाहक ठरलेले आहेत. खरेतर शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांचा वाढदिवस एकाच दिवशी असणं हा महाराष्ट्राच्या राजकीय परिप्रेक्षातील मोठा योग. पण नियतीने गोपीनाथ मुंडेंना अकाली हिरावून नेले आणि आज त्यांची जयंती साजरी करावी लागत आहे.
कोणत्याही व्यक्तीचा वाढदिवस असेल किंवा जयंती, त्यांची आठवण काढली जाते, ती त्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानावरुन, त्यांनी गाठलेल्या उंचीवरुन, आणि ही उंची जितकी मोठी असते, तितकाच मोठा त्यांचा संघर्ष असतो आणि हा संघर्षच पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देणारा असतो, त्यांच्यात चेतना निर्माण करणारा असतो.
आज शरद पवारांचा वाढदिवस आणि गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करत असताना या दोघांच्याही संघर्षातील अनेक साम्यस्थळांचा उल्लेख करावाच लागेल.
महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा देण्याचे काम शरद पवारांनी केले. तब्बल ४-५ दशके स्वत:भोवती राजकारण फिरवणे सोपे नसते, पण शरद पवारांनी तो संघर्ष केला आहे. आज पवारांची राजकीय उंची मोठी असली तरी राजकारणाच्या सुरुवातीला ज्यावेळी स्वातंत्र्य आंदोलनातून आलेली पिढी राजकारणात सक्रिय होती, त्यावेळी यशवंतराव चव्हाण, वसंत दादा आदी मातब्बर कॉंग्रेस पक्षात असताना, ज्यावेळी कॉंग्रेसवर हायकमांडचा पगडा होता आणि महाराष्ट्रात शेकापचीही मोठी शक्ती होती, त्याकाळात शरद पवारांसारख्या नवख्या तरुणाला राजकारणात स्वत:ची ओळख निर्माण करणे सोपे नव्हते. त्यासाठी त्यांना अनेकदा संघर्ष करावा लागला, अनेकदा बंड करावे लागले, तडजोडीही कराव्या लागल्या, अगदी इंदिरा गांधींनाही विरोध करावा लागला, पुढे राजीव, सोनिया यांच्याही ते कधीच पुर्ण विश्वासातले नव्हते. गांधी परिवाराच्या फारसे विश्वासातले नसताना कॉंग्रेस आणि समविचारी पक्षांमध्ये काम करणे सोपे नाही, सिंडीकेट च्या अनेक नेत्यांचे राजकारण काही काळानंतर संपले, पण पवारांचे राजकारण अजूनही अढळ आहे. हे राजकारण करताना त्यांनी एक वेगळे समाजकारण, बेरजेचे समाजकारण केले. महिला आरक्षणाचा निर्णय असेल, मंडलच्या अंमलबजावणीची भूमिका असेल, विद्यापीठ नामविस्तार असेल किंवा उपेक्षित घटकांना राजकीय प्रतिष्ठा देण्यासाठी जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न आणि त्यासाठी अनेकदा मोजलेली किंमत असेल, पण या भूमिकांमुळेच शरद पवारांचे राजकारण कधी संकुचित झाले नाही आणि हा व्यापकपणाच आजही त्यांच्या राजकारणाचे शक्ती स्थळ आहे.
गोपीनाथ मुंडेंचेही तसेच. भाजप सारख्या त्यावेळी 'शेठजी भटजींचा पक्ष ' अशी प्रतिमा असलेल्या पक्षाला महाराष्ट्रात बहुजनांचा पक्ष बनविणे सोपे नक्कीच नव्हते. परंपरागत कॉंग्रेसची व्होटबॅंक असलेला समुह भाजपच्या मागे उभे करणे, राज्यात शरद पवारांसारखा तगडा विरोधक असतानाही 'माधवं' च्या राजकीय समिकरणातून या उपेक्षीत समूहांना राजकीय परिघात केंद्रस्थानी आणून ठेवणे आणि त्यांच्यामध्ये राजकीय जागृती आणि चेतना निर्माण करणे हा प्रवास प्रचंड संघर्ष, इच्छाशक्ती आणि तितक्याच मुत्सद्दीपणाचा आहे. एकाचवेळी पक्षातील आणि पक्षा बाहेरील विरोधकांचा सामना करतानाच 'राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो' या राजकीय सुत्रातून स्वत:चे राजकारण व्यापक करण्याचे काम त्यांनी केले. ज्यावेळी ओबीसींसाठी निर्णायक भूमिका घेण्याची वेळ आली, त्यावेळी प्रसंगी पक्षालाही अंगावर घेण्याची तयारी गोपीनाथ मुंडेंनी दाखविली होती. आपण ज्या समाजातून, समूहातून येतो त्यांचे केवळ राजकीय नव्हे तर आर्थिक, सामाजिक पुनरुत्थान हे गोपीनाथ मुंडेंच्या आयुष्याचे सुत्र होते आणि त्यामुळेच गोपीनाथ मुंडे जिवंतपणीच लाखोंच्या देव्हाऱ्यात होते. हे मोठेपण एकतर फार मोजक्या लोकांना मिळते आणि अगदी बोटावर मोजण्या इतक्यांनाच टिकविता येते. गोपीनाथ मुंडेंना ते जमले होते.
महाराष्ट्राचे राजकारण बहुजन केंद्री करण्यात गोपीनाथ मुंडेंचा वाटा मोठा होता. गोपीनाथ मुंडेंच केवळ असणं हा सुध्दा भाजपेतर पक्षांमधील ओबीसी नेतृत्वालाही मोठा आधार होता. सरंजामी राजकीय मानसिकता असणाऱ्या महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे या नावाचा राजकीय आदर अगदी आंबेडकरी समूहापासून ते ओबीसी, भटक्यांसह विस्थापित मराठा समाज आणि मुंडे भाजपचे असले तरी अल्पसंख्यांक समुदायालाही वाटायचा यातच सारे काही आले.
अशा या राजकारण समाजकारणाला एका व्यापक पातळीवर पोहचविणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या, दोन वेगळे राजकीय प्रवाह असतानाही अनेक साम्यस्थळे असणाऱ्या व्यक्तीमत्वांचे योगदान महाराष्ट्र विसरुच शकत नाही. महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्यांना शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे ही नावे म्हणजे उर्जा, प्रेरणा आणि चेतना आहेत. शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, तर गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतींना अभिवादन.