Advertisement

वैज्ञानिक संशोधनासाठी टाटांचे दहा फुगे उडणार

प्रजापत्र | Friday, 25/11/2022
बातमी शेअर करा

बीड : वैज्ञानिक संशोधनासाठी हैदराबाद येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्थेकडून पुढील पाच महिन्यात वैज्ञानिक उपकरणांसह १० बलून फ्लाईटस् आकाशात सोडण्यात येणार आहेत. ते उस्मानाबादसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पडण्याची शक्यता संस्थेने वर्तविली आहे. अशी उपकरणे जमिनीवर पडलेली आढळल्यास कोणीही स्पर्श न करता प्रशासनास माहिती कळविण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने बुधवारी केले आहे.

 

 

अणुऊर्जा विभाग, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हैदराबाद येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्था १ नोव्हेंबर ते ३० एप्रिल २०२३ या पाच महिन्यांच्या काळात १० बलून फ्लाईटस् आकाशात सोडणार आहे. यामध्ये संशोधनाच्या दृष्टीने वैज्ञानिक उपकरणे ठेवलेली असतील. ५० ते ८५ मीटर व्यासाचे हे फुगे हायड्रोजन वायूने भरलेले असतील. ते जमिनीपासून ३० ते ४२ किमी उंचीवरून उडतील. काही तासांच्या उड्डाणानंतर हे फुगे मोठ्या रंगीत पॅराशूटसह जमिनीवर खाली येतात. हैदराबादपासून ते साधारणत: २५० ते ३०० किमी अंतरावर उतरतील, असा संस्थेचा अंदाज आहे.

 

 

या व्यासात कोणते जिल्हे...
संस्थेचे हे फुगे महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, उत्तर कर्नाटक राज्यातून वहन करणार आहेत. महाराष्ट्रातील औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, सांगली, सातारा, अहमदनगर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, जळगाव व सोलापूर जिल्ह्यात उतरण्याची शक्यता संस्थेने वर्तविली आहे.

 

 

हाताळणी ठरेल धोकादायक...
फुग्यांमध्ये संवेदनशील वैज्ञानिक उपकरणे असतील. त्यांच्याशी छेडछाड झाल्यास महत्त्वाची माहिती नष्ट होऊ शकेल. तसेच काही उपकरणे हाय व्होल्टेज असल्याने त्यांची हाताळणी धोकादायक ठरू शकेल. यामुळे उपरोक्त फुगे जमिनीवर कोणास आढळल्यास पोलिस, डाक विभाग किंवा स्थानिक प्रशासनास कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे. माहिती देणाऱ्यांना योग्य बक्षीसही दिले जाणार असल्याचे ते म्हणाले.

Advertisement

Advertisement