औरंगाबाद- येथील शासकीय विज्ञान संस्थेत संशोधन करणाऱ्या एका विद्यार्थिनीवर पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे.
प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. त्याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडालीय. गजानन मुंडे असे या तरुणाचे नाव असल्याचे समजते. मात्र, तो कोणत्या गावचा रहिवासी आहे, हे अजून कळालेले नाही.
कशी घडली घटना?
महाविद्यालयात आज दुपारी जेवणाची सुट्टी झाली. त्यावेळी मुलगी प्राध्यापक कक्षात एकटीच असल्याची संधी साधून गजानन आत घुसला. आत येताच त्याने आतून कडी लावून घेतली. काही कळण्याच्या आतच त्याने स्वतःच्या व मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेत मुलीला मिठी मारली. या घटनेत दोघेही भाजले. त्यांना घाटी रुग्णालयात हलविण्यात आले असून, मुलगा साधारण 70 तर मुलगी 30 टक्के भाजल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.