बिलकिस बानो प्रकरणावरून देशभरात महिलांमध्ये जो आक्रोश आहे तो आक्रोश बीड जिल्ह्यात रस्त्यावर आलेला पहायला मिळाला. मुस्लिम हिला इतक्या मोठ्या संख्येने रस्त्यावर येतात हे चित्र महाराष्ट्रात पहिल्यांदाच पहायला मिळाले होते. देशभरात कमी अधिक फरकाने हिच परिस्थिती आहे. काही ठिकाणी लोक व्यक्त होतायत. तर काही ठिकाणी अंतर्गत घुसमट सुरू आहे. मात्र बिलकिस बानो प्रकरणातील गुन्हेगारांना जे मोकळे सोडले गेले ते सामान्य माणसाला आवडलेले नाही आणि त्याचाच आक्रोश सामान्यांच्या मनात आहे. सरकारला आज ना उद्या याचा जाब द्यावा लागणार आहे.
मुस्लिम समाजातील महिला सहसा घराबाहेर पडत नाहीत. अशा महिलांनी एखाद्या मोर्चाला यावे हे चित्र तर दुर्मिळ म्हणावे असेच असते. असे असतांना बीड जिल्ह्यात बिलकिस बानो प्रकरणावरून हजारो महिला रस्त्यावर उतरल्या, मोर्चाद्वारे येवून त्यांनी आपल्या भावना प्रशासनासमोर व्यक्त केल्या. ही घटना ऐतिहासिक म्हणावी अशी आहे. ज्या समाजातील महिला घरामध्ये देखील बैठकीत इतर कोणी आले तर समोर येत नाहीत. त्या महिलांना रस्त्यावर येण्याची आवश्यकता वाटावी यातच बिलकिस बानो प्रकरणाने सामान्यांच्या मनामध्ये असुरक्षितता कोणत्या पातळीवर पोहचली आहे हे सहज लक्षात येते.
मुस्लिम महिलांनी घराबाहेर पडू नये असे नाही किंवा त्या घराबाहेर पडत नाहीत याचे समर्थनही करायचे नाही परंतू परिस्थिती किती घातक आहे आणि हजारो मुस्लिम महिला रस्त्यावर उतरता त्याचा अर्थ काय होतो याची दाहकता लक्षात यावी यासाठी हे सांगणे आवश्यक होते. देशभरच महिलांवरचे अत्याचार कमी होण्याचे नाव घेत नाहीत. महाराष्ट्रासारख्या राज्यात देखील महिला अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कितीही कठोर कायदे केले, शक्तीसारखे विधेयक आणले तरी अत्याचारांचे प्रमाण कमी होत नाही, याचे कारण व्यवस्थेत दडले आहे आणि ती व्यवस्था कोणत्या पातळीपर्यंत सडलेली आहे हेच बिलकिस बानो प्रकरणात सार्या देशाने पाहिले आहे.
बिलकिस बानो प्रकरणातील जे गुन्हेगार होते त्यांच्यावरचा गुन्हा शाबीत झालेला आहे त्यामुळे ते काही गरीब बिचारे आरोपी नक्कीच नव्हते. एकवेळ आरोप शाबीत होईपर्यंत आरोपीच्या बाजूने सहानुभूती असणे याचा विचार करता येईल मात्र एखाद्याचा गुन्हा सिद्ध झालेला असतांना त्या गुन्हेगाराला जर सरकार आमच्या अधिकारात आहे म्हणून माफी देणार असेल तर प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे माफी देणारी व्यवस्था देखील त्या गुन्ह्याचे समर्थन करत आहे का? किंवा गुन्हेगारांना पाठबळ देत आहे का? असा प्रश्न पडायला भाग पाडत असते. बिलकिस बानो प्रकरणात हेच घडले आहे आणि म्हणूनच अशा गुन्हेगारांना माफी मिळणे हा देशापुढचा सर्वात मोठा प्रश्न आहे. या विषयात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे, त्यावर गुजरात सरकारला नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र आपल्या न्यायव्यवस्थेचे आजचे एकंदर चित्र पाहिले तर हे प्रकरण नेमके कधी धसास लागेल हे सांगणे अवघड आहे. असेही बिलकिस बानोला सुरूवातीपासूनच न्यायासाठी अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंतचा संघर्ष करावा लागला होता. अशा कितीतरी बिलकिस बानो आज देशात गावखेड्यात आहेत. अनेक महिलांवरील अत्याचाराची साधी दखलही घेतली जात नाही. अशा परिस्थितीत गुन्हा सिद्ध झालेल्या आरोपींना माफी मिळणार असेल तर देशात अराजकता माजेल हेच बीडमध्ये निघालेल्या मोर्चांमधून ध्वनीत होत आहे. बीडमधला आक्रोश हा देशातील सामान्यांचा प्रातिनिधीक आक्रोश आहे. ज्या महिला भगिनी कधी उंबरा ओलांडत नाहीत त्या जर रस्त्यावर येवून आपला आवाज बुलंद करणार असतील तर जखम खुप खोलवर झालेली आहे याची दखल सरकारने घेणे आवश्यक आहे.