बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जनता दल युनायटेडचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करताच भाजपा आमदारांनी सभात्याग केला. विश्वासदर्शक ठरावापूर्वी भाजपा नेते विजय कुमार यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सत्ताधारी आमदारांनी कुमार यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला होता.
या विशेष अधिवेशनात विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेदरम्यान बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग हे सरकारचे तीन जावाई आहेत. जे भाजपाला शरण जात नाहीत, त्यांच्यावर या जावायांकडून दबाव आणला जातो”, असा आरोप यादव यांनी केला आहे. दरम्यान, बहुमत चाचणीआधी राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात झालेल्या कथित नोकरी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने नेत्यांच्या घरावर छापेमारी केली आहे.
काही आठवड्यांपूर्वी भाजपासोबत युती तोडल्यानंतर नितीश कुमार यांनी काँग्रेस, डावे पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलासोबत महागठबंधन सरकार स्थापन केलं आहे. दरम्यान, बिहारमधील राजकीय स्थितीबाबत निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी मोठं भाकित वर्तवलं आहे. पुढच्या निवडणुकांच्याआधी बिहारमधील चित्र पुन्हा एकदा बदलेलं दिसेल, असे किशोर यांनी म्हटले आहे.