Advertisement

अर्णव गोस्वामींच्या पत्नीवर अटकेची टांगती तलवार, कधीही अटक होण्याची शक्यता

प्रजापत्र | Thursday, 05/11/2020
बातमी शेअर करा

रायगड: रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता अर्णव गोस्वामी यांच्या पत्नीलाही अटक होण्याची शक्यता आहे. आज मुंबई पोलिसांकडून अर्णव गोस्वामींच्या पत्नीला कधीही अटक होऊ शकते, अशी माहिती  खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. रायगड पोलीस काल अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळी अर्णव गोस्वामी यांच्यासह त्यांच्या पत्नीने रायगड पोलिसांच्या कारवाईला विरोध करून त्यांना धक्काबुक्की केली होती. त्याविरोधात रायगड पोलिसांच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानावडे यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यावरूनच त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी काल अर्णव गोस्वामीला अटक केल्यानंतर त्याला मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा अलिबाग पोलिसांनी सेशन कोर्टात धाव घेऊन अर्णवच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. त्यावर आज किंवा उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अर्णवच्या वकिलांनी त्याच्या जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेण्याच्या हालचाली सुरू केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Advertisement

Advertisement