शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे रविवारी मुंबई-पुणे दृतगतीमार्गावर निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर घातपाताचा संशय 'शिवसंग्राम'च्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त झाला. मात्र, या प्रकरणाची संपूर्ण चौकशीही होत असानातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेटेंचा मृत्यू अपघातामुळेच झाला आणि त्यातही चालकाचे चुकीचे जजमेंट होते हे सांगितले. त्यामुळे एकप्रकारे मेटेंचा घातपाताने नव्हे तर अपघाताने मृत्यू झाल्याचेच फडणवीसांनी स्पष्ट केले.
कसा झाला अपघात?
फडणवीसांनी सभागृहात सांगितले की, एक मोठा ट्रेलर रस्त्याच्या शेवटच्या लेनमधून चालायला हवा होता, पण तो मधल्या लेनमधून मार्गक्रमण करीत होता. त्यामुळे मेटे यांच्या चालकाला ओव्हरटेक करायला जागा मिळत नव्हती. काही काळ चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मेटेंची कार तिसऱ्या लेनमध्ये गेली, पण तिथे ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला तिथेही समोर एक वाहन होते. या दोन वाहनांमध्ये जी थोडी जागा होती. त्यातून पुन्हा पुढे ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न चालकाने केला. ते चुकीचे जजमेंट होते कारण तेवढी जागा कार निघण्यासाठी नव्हती.
म्हणून मेटेंचा मृत्यू!
फडणवीसांनी सभागृहात सांगितले की, ज्यावेळी कार बाजूला कंटेनर आणि समोर वाहन होते त्यातून चालकाने गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यात चालकाची साईडविरुद्धची साईड जिथे बाॅडीगार्ड आणि विनायक मेटे बसले होते, त्यासाईडला जबरदस्त धक्का बसला. त्यामुळे थेट डॅश बसून डाॅक्टरांनी सांगितल्याप्रमाणे विनायक मेटेंचा अपघातानंतर जागीच मृत्यू झाला.
आधी घातपाताचा संशय
3 ऑगस्टला विनायक मेटे यांच्या गाडीच्या मागे एक वाहन होते, तर समोर आयशर ट्रक होता. दोन-अडीच किलोमिटर ओव्हरटेकचा खेळ सुरू होता, पण विनायक मेटे यांनी ट्रकला जाऊ द्या, आपली गाडी सुरक्षित चालवा अशा चालकाला सूचना दिल्या होत्या, असा खळबळजनक खुलासा त्यावेळी त्यांच्याच गाडीत बसलेले 'शिवसंग्राम'च्या कार्यकर्ते अण्णासाहेब मायकर यांनी ऑडिओ क्लिपमधून केला होती.