मुंबई: चंद्रकांत पाटील यांचा शिंदे सरकारमध्ये समावेश करण्यात आल्यानंतर भाजपच्या प्रदेशाक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या स्पर्धेतच चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव सर्वाधिक आघाडीवर होतं. त्यानुसार अखेर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेच भाजपचे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आलं आहे. तर मुंबईच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज संध्याकाळी या दोन्ही नेत्यांच्या नावांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. बावनकुळे हे ओबीसी नेते आहेत. तर शेलार हे मराठा समाजातून येतात. त्यामुळे भाजपने मराठा आणि ओबीसी नेत्यांना महत्त्वाचे पद देऊन जातीय समीकरणे साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा फायदा भाजपला येत्या काळात होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच बावनकुळे यांनी त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिल्याच्या वृत्ताला दुजोराही दिला आहे.
बातमी शेअर करा