न्यायालयाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून यंदाचा गणेशोत्सव उत्साहात, साजरा करू. गणेशोत्सव मंडळांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, गणेशोत्सवाच्या अखेरच्या पाच दिवसात रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी असेल,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री उशिरा स्पष्ट केले.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयात मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील गणेशोत्सव मंडळांची बैठक झाली. यावेळी “जय गणेश व्यासपीठा”चे श्रीकांत शेटे, प्रसाद कुलकर्णी, सुनील रासने, प्रवीण परदेशी, नितीन पंडित, विकास पवार, शिरीष मोहिते, पियूष शहा आदी गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते. पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिंदे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.या बैठकीनंतर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.