ठाणे : बंड केल्यापासून एकनाथ शिंदे हे सतत धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव घेत आहे. आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन जात असल्याचे सांगत आहे. मी मुलाखत देईल तर भूकंप येईल. आनंद दिंघे यांच्यासोबत काय घडले हेही सांगेल, असेही ते म्हणाले होते. अशात ठाण्यातील बालेकिल्ला वाचवण्यासाठी शिवसेनेने मोठी खेळी खेळली आहे. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे (Kedar Dighe) यांची ठाणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. एकप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न यातून केला आहे.
माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ठाणे जिल्ह्यातील (Thane District) शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी ही माहिती दिली आहे. रविवारी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे, केदार दिघे, अनिता बिर्जे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने नवीन नियुक्त्या जाहीर केल्या.
शिवसेनेने (Shiv sena) आनंद दिघे यांच्या सहकारी असलेल्या अनिता बिर्जे यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती केली आहे. केदार दिघे (Kedar Dighe) यांच्या नियुक्तीनंतर ठाण्यात पुन्हा दिघे राज सुरू होईल का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. प्रदीप शिंदे यांच्यावर ठाणे शहरप्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच चिंतामणी कारखानीस यांची ठाणे विभागीय प्रवक्ते पदावर नेमणूक केली आहे.