मुंबई : उच्छाद घालणाऱ्या उंदरांचा नायनाट करण्यासाठी विषारी औषध लावलेला टोमॅटो टीव्ही बघण्याच्या नाद्यात चुकून मॅगीमध्ये टाकून खाल्ल्यामुळे मालवणीत २७ वर्षांच्या महिलेचा बुधवारी मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासणी उघड झाले. याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
रेखादेवी फुलकुमार निशाद असे मृत महिलेचे नाव असून त्या मालाड पश्चिम येथील मार्वे रोड परिसरातील पास्कल वाडी येथे वास्तव्यास होत्या. घरात उंदरांचा सुळसुळाट झाल्यामुळे रेखादेवी यांनी टॉमेटोला विषारी औषध लावून ठेवले होते. टीव्ही पाहण्याच्या नादात २० जुलैला त्यांनी त्याच टॉमेटोचा वापर करून मॅगी बनवली. ती मॅगी खाल्ल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. रेखादेवी यांना उपाचारासाठी कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयाने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन महिलेच्या नातेवाईकांचा जबाब नोंदवला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून काही वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. तसेच महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भगवती रुग्णालयात नेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.