भोपाळ - मध्य प्रदेशमधील खंडवा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील तीन बहिणींनी एकाच दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे गावात खळबळ माजली आहे. पोलिसांनी तीन बहिणींचे मृतदेह पोस्टमार्टेमसाठी खंडवा जिल्ह्यातील मुख्यालयात पाठवले आहेत. आता या आत्महत्येच्या कारणामाचा शोध पोलीस घेत आहेत.
ही धक्कादायक घटना खंडवा जिल्ह्यातील जावर ठाण्याच्या क्षेत्रातील कोठाघाट गावात घडली आहे. या तिन्ही बहिणी आई आणि भावासह राहायच्या. त्यांच्या वडिलांचे आधीच निधन झाले होते. मंगळवारी रात्री तिन्ही बहिणींनी आई आणि भावासह एकत्र भोजन केलं. त्यानंतर सगळेजण झोपी गेले. रात्री दहाच्या सुमारास आईचे डोळे उघडले तेव्हा तिने दुसऱ्या खोलीत पाहिले तर तिन्ही मुली गायब झाल्या होत्या. त्यामुळे तिने या मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा त्या तिन्ही बहिणींचे मृतदेह एकाच दोरीने झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. हा प्रकार पाहून मुलींच्या आईला धक्का बसला.