करोनाकाळात पोलिसांच्या रिक्त पदांची संख्या तीन पटीने वाढल्याचे खुद्द राज्य सरकारनेच उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात उघड केले आहे. पोलिसांच्या रिक्त पदांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याचे प्राथमिक कारण हे करोना असून करोनाकाळात भरती प्रक्रियेला स्थगिती दिली गेली. शिवाय करोनामुळे अनेक पोलिसांचा मृत्यू झाला, असा दावा सरकारने प्रतिज्ञापत्रात केला आहे. त्याचवेळी लवकरच भरती प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी हमीही न्यायालयाला दिली. न्यायालयाने त्यावर रिक्त पदे भरण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत हे स्पष्ट करणारे अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सरकारला दिले.
हवालदार ते पोलीस महासंचालक पदाच्या जागा रिक्त होत्या. २०१९ मध्ये रिक्त पदांची टक्केवारी पाच होती. ती १३.४ पर्यंत गेली असून ५ जुलैपर्यंत एकूण दोन लाख १९ हजार ७७६ मंजूर पदांपैकी २९ हजार ४०१ पदे रिक्त आहेत, असेही गृह विभागाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.