Advertisement

झोका खेळताना गळफास लागून अकरा वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यु

प्रजापत्र | Monday, 25/07/2022
बातमी शेअर करा

आई वडील मजुरी करण्यासाठी कामावर गेलेले असल्याने घरात राहिलेल्या मुलांनी विरंगुळा म्हणून झोका खेळण्याचा निर्णय घेतला परंतु झोका खेळतांना मुलांवर लक्ष ठेवण्यास कोणीही वडीलधारी व्यक्ती नसल्याने झोका खेळण्यासाठी बनवलेल्या साडीचाच गळफास लागल्याने एका अकरा वर्षीय चिमुरडीला आपला प्राण गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना भिवंडीतील भादवड पुंडलिक नगर या ठिकाणी रविवारी घडली आहे. वर्षा श्रीजन गौतम वय ११ वर्ष असे मृत दुर्दैवी मुलीचे नाव आहे.

 

 

मयत मुलीचे वडील श्रीजन मोतीलाल गौतम व त्याची पत्नी असे दोघेही सोनाळे येथे मोलमजुरी करण्यासाठी जात असताना घरात अकरा वर्षीय वर्षा या आपल्या मोठ्या मुलीकडे पाच वर्षांचा मुलगा व दहा महिन्यांची मुलगी सांभाळण्याची जबाबदारी देऊन मजुरीवर जात असत.रविवारी नेहमी प्रमाणे आई वडील कामावर गेले असता घरात असलेली वर्षा हि शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीसह घराच्या दरवाजात साडी बांधून केलेल्या झोक्यावर झोका खेळत होती. परंतु या साडीच्या झोक्यावर झोका यावर खेळत असताना झोक्याला पिळ देत गिरकी घेतली असता तो पिळ वर्षाच्या गळ्याभोवती घट्ट बसल्याने वर्षाचा जीव गुदमरून त्यातच तिचा दुर्दैवी अंत झाला आहे .घटनेची माहिती मिळताच स्थानिक शांतीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
 

Advertisement

Advertisement