रेल्वेने प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटावर कोणतीही सूट मिळणार नाही. त्यांना पूर्ण पैसे भरूनच प्रवास करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटावर (Rail fare) सूट देण्यात येत होती. मात्र कोरोना काळात तिकीटावरील ही सूट बंद करण्यात आली. सध्या कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी ज्येष्ठ नागरिकांना कोणताही दिलासा मिळणार नाही. आत्तापर्यंत सुरू असलेल्या पद्धतीप्रमाणेच त्यांना प्रवासासाठी तिकीटाची पूर्ण रक्कम भरावी लागणार आहे. संसदेत यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnaw) यांनी हे नमूद केले. तसेच ट्रेनने प्रवास करणाऱ्या खेळाडूंनाही तिकीटावर कोणतीही सूट मिळणार नसल्याचे, त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासासाठी कोणताही दिलासा मिळणार नाही.
1667 कोटी रुपयांचा बोजा सहन करावा लागला
रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भाड्यात देण्यात येणारी सूट, यासंदर्भात बोलताना रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले की, सरकार अजूनही रेल्वे भाड्याचा 50 टक्के खर्च उचलत आहे. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटावर जी सूट देण्यात येत होती, त्यामुळे सरकारला 2019-2020 साली 1667 कोटी रुपयांचा बोजा सहन करावा लागला होता. तर 2018-2019 साली सरकारने 1636 कोटी रुपयांचा बोजा सहन केला.