Advertisement

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याची निवृत्तीची घोषणा

प्रजापत्र | Monday, 18/07/2022
बातमी शेअर करा

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांना धक्का दिला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उद्या होणाऱ्या वन डे सामन्यात तो शेवटचे राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. ३१ वर्षीय स्टोक्सने १०४ वन डे सामन्यांत प्रतिनिधित्व केले असून २०१९च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये त्याने प्लेअर ऑफ दी मॅचचा पुरस्कार पटकावला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या वर्ल्ड कप फायनल लढतीत स्टोक्सने नाबाद ८४ धावांची अविस्मरणीय खेळी केली होती.  २०११मध्ये त्याने आयर्लंडविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्याच्या नावावर तीन शतकांसह २९१९ धावा व ७४ विकेटे्स आहेत.   

 

 

त्याच्या नेृत्वाखाली त्याने मागील वर्षी पाकिस्तानविरुद्धची वन डे मालिका ३-० अशी जिंकली होती.  बेन स्टोक्सने सोशल मीडियावरून निवृत्तीची घोषणा केली,''मंगळवारी डरहॅम येथे मी इंग्लंडसाठी अखेरचा वन डे सामना खेळणार आहे. वन डे क्रिकेटमधून मी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणे माझ्यासाठी अत्यंत आव्हानात्मक होते. इंग्लंड संघातील प्रत्येक खेळाडूसोबत खेळतानाचा मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला आहे. आमचा प्रवास अविश्वसनीय होता.''

 

 

''हा निर्णय न पचणारा असला तरी पटणारा नक्की आहे. मी आता या फॉरमॅटमध्ये १०० टक्के योगदान देऊ शकत नाही. त्यामुळे संघातील माझ्याजागी आणखी कोणीतरी चांगला खेळाडू स्थान डिझर्व्ह करतो. तीन फॉरमॅट खेळणे हे आता शक्य नाही. आता माझ्याकडे जे काही आहे ते मला कसोटी क्रिकेटला द्यायचे आहे आणि या निर्णयानंतर मी ट्वेंटी-२० क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करू शकेन, असे मला वाटते,''असे स्टोक्सने लिहिले.  

 

 

तो पुढे म्हणतो,''जोस बटलर, मॅथ्यू पॉट्स, अन्य खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.''

Advertisement

Advertisement