Advertisement

शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटाच्या बैठकीला हजर

प्रजापत्र | Monday, 18/07/2022
बातमी शेअर करा

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. शिवसेनेचे अनेक आमदार, कार्यकर्ते, आजी-माजी पदाधिकारी देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. यानंतर आता मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदार देखील फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी सेनेच्या खासदारांकडून करण्यात आली होती. याबाबत शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी एक पत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलं होतं.

 

 

शिवसेना खासदारांच्या मनात सुरू असलेली खदखद लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा दिला. त्यानुसार आज राष्ट्रपतीपदासाठीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. पण या मतदानानंतर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या १२ खासदारांनी शिंदे गटाच्या बैठकीला हजरी लावल्याची माहिती समजत आहे.

 

 

काही वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रपतीपदाच्या मतदानानंतर शिंदे गटाची ऑनलाइन पद्धतीने एक बैठक पार पडली आहे. या बैठकीला शिवसेनेच्या १२ खासदारांनी हजेरी लावली होती. या बैठकीत जवळपास अर्धा तास चर्चा झाली. गटनेते पदासाठी राहुल शेवाळे आणि मुख्य प्रतोदपदासाठी भावना गवळी यांच्या नावाची चर्चा देखील झाल्याची माहिती समजत आहे. शिंदे गट सध्या नवीन गट स्थापन करण्याच्या तयारीत असून त्याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रात्री दिल्लीला रवाना होणार असल्याचंही समजत आहे.
 

Advertisement

Advertisement