मध्य प्रदेशातील नर्मदा नदीमध्ये राज्य परिवहन महामंडळाची बस कोसळून १३ प्रवाशांता मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. बचावकार्य व्यवस्थित पार पाडावं व जखमींवर उपचारासाठी मध्यप्रदेशमधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश त्यांनी जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी संपर्क साधला आणि सहकार्यासाठी विनंती केली. यादरम्यान त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्री कार्यालयाने ट्वीट करत माहिती दिली आहे. “मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये बस बुडून झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य परिवहन महामंडळाला दिले आहेत”.