'घराजवळ शौचास बसू नका, वास येतो', असे सांगितल्यामुळे शेतवस्तीवर राहणाऱ्या कुटुंबावर जमावाने धारदार शस्त्राने हल्ला केला. यात आई व मुलाचा मृत्यू झाला असून वडील व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. जालन्यातील एरंडवडगाव शिवारात शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
जमावाच्या हल्ल्यात सुमन देवीलाल सिल्लोडे (वय, 45) व त्यांचा मुलगा मंगेश सिल्लोडे (वय 25) यांचा मृत्यू झाला. तर, देवीलाल सिल्लोडे (वय 50) व योगेश सिल्लोडे (वय 20) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या जालना येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सशस्त्र जमावापुढे हतबल
शुक्रवारी सायंकाळी देवीलाल सिल्लोडे हे तांडावस्तीवरून आपल्या घराकडे जात असताना वस्तीतच राहणाऱ्या काही महिला व पुरुषांनी अचानक त्यांना शिवीगाळ केली. देवीलाल यांनी घराजवळ शौचास बसत जाऊ नका, असे पूर्वी या महिला, पुरुषांना सांगितले होते. त्याचा राग आल्याने त्यांना शिवीगाळ करत थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे घाबरलेल्या देवीलाल सिल्लोडे यांनी आरडा-ओरड करत मला वाचवा म्हणत कुटुंबीयांना हाक दिली. मंगेश व योगेश दोन्ही मुले वडिलांना जमावाच्या तावडीतून सोडवण्यासाठी धावत आले. त्या पाठोपाठ पत्नी सुमनही आल्या. मात्र, 15-20 जणांच्या सशस्त्र जमावापुढे चौघेही हतबल झाले.
आई-मुलाचा जागीच मृत्यू
घटनेत गंभीर जखमी झालेली आई सुमन व मुलगा मंगेश यांचा जागीच मृत्यू झाला. तर, वडील देवीलाल व छोटा मुलगा योगेश दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती समजताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन भांडण सोडवले. त्यानंतर चौघांनाही जिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून सुमन सिल्लोडे व मंगेश सिल्लोडे यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तर, देवीलाल व योगेश यांना तातडीने उपचारासाठी दाखल करून घेतले. रात्री 10 वाजेदरम्यान पोलिसांनीही जिल्हा रुग्णालयात येऊन जखमींची विचारपूस केली. हल्ल्याप्रकरणी पीडितांचे जबाब घेतल्याची माहिती मृत व जखमींच्या नातेवाईकांनी दिली.
चौघे अटकेत, 6 फरार
जखमींच्या तक्रारीवरून सेवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मारेकरी 3 महिला व एका पुरुषास पोलिसांनी घटनास्थळाहून अटक केली. इतर सहा जण फरार झाल्याची माहिती परतुरचे पोलीस उपाधीक्षक राजू मोरे यांनी दिली. पोलिस आरोपींच्या शोधात असल्याचेही मोरे म्हणाले.