Advertisement

राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

प्रजापत्र | Friday, 15/07/2022
बातमी शेअर करा

मुंबई : राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळतोय. गडचिरोली, चंद्रपूर, नांदेडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. तर अनेक भागात दरड कोसळण्याच्याही घटना घडल्या आहेत. अशावेळी राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यातील पूरस्थिती आणि आपत्कालीन परिस्थितीमुळे सहकार विभागानं हा निर्णय घेतलाय. सुमारे 8 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

 

 

राज्याच्या सहकार विभागाने काढलेल्या आदेशानुसार, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार राज्यातील बहुतांश भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन तसंत वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. तसंच भारतीय हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या 13 जुलै 2022 रोजीच्या अहवालानुसार राज्यातील पूरस्थितीमुळे 1 जुलै ते 12 जुलै या कालावधीत 89 व्यक्ती आणि 181 प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेली 249 गावं, तर एकंदरीत 1368 घरांची पडझड झालेली आहे. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील अनेक जिल्ह्यात एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत. राज्यातील सर्व धरणं पूर्णपणे भरली असल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यास त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्था आणि जनजीवनावर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.
 

Advertisement

Advertisement